अंतिम सत्रामध्ये शेअर बाजार घसरणीसह बंद
सेन्सेक्स 187 अंकांनी घसरणीत : बँकिंग समभागांमुळे बाजारात निरुत्साह
वृत्तसंस्था/ मुंबई
बँकिंग समभागांच्या नकारात्मक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसोबत बंद झाल्याचे पाहायला मिळाले. निफ्टीतील आयटी आणि बँक निर्देशांक कमकुवत होत बंद झाले.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 187 अंकांच्या घसरणीसोबत 65,794 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 33 अंकांनी घसरणीसोबत 19,731 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी मिडकॅप 100 चा निर्देशांक 0.15 टक्के इतकी तेजी दर्शवू शकला तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.36 टक्के तेजीत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग घसरणीसह बंद झाले तर 10 तेजीसमवेत बंद झाले.
महत्त्वाचे म्हणजे निफ्टीतील आयटी आणि बँकिंग क्षेत्रातल्या समभागांमध्ये घसरण राहिल्याने त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला. वैयक्तिक कर्ज व क्रेडिट कार्डसंबंधी रिझर्व्ह बँकेने गुरुवारी नवी कडक नियमावली जारी केल्याने याचा परिणाम शुक्रवारी शेअरबाजारात त्यांच्या समभागांवर दिसला. शुक्रवारी एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफ, अपोलो हॉस्पिटल आणि लार्सन टूब्रो यांचे समभाग सर्वाधिक वधारलेले पाहायला मिळाले तर दुसरीकडे एसबीआय, अॅक्सिस बँक, ओएनजीसी आणि बीपीसीएल यांचे समभाग सर्वाधिकरित्या नुकसानीत होते. गौतम अदानी समूहातील 9 लिस्टेड कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे समभाग कमकुवत दिसून आले. अदानी एंटरप्राइजेस, एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट यांचे समभाग मात्र काहीसे तेजीत होते. अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, अदानी पॉवर आणि एनडीटीव्ही यांचे समभाग मात्र घसरणीत होते. दुसरीकडे पटेल इंजीनियरिंग यांच्या समभागाला पाच टक्के वाढीसह अप्पर सर्किट लागले. एक्साईड इंडस्ट्रीज, ओम इन्फ्रा, देवयानी इंटरनॅशनल, महिंद्रा आणि महिंद्रा, कामधेनु लिमिटेड आणि टाटा मोटर्स यांचे समभाग मात्र तेजीसह व्यवहार करत होते. मल्टीबॅगर उत्पन्न देणारे गती लिमिटेड आणि जिओ फायनान्शिअल यांचे समभाग शुक्रवारी नुकसानीत होते. अशनीषा इंडस्ट्रीज, आयआरसीटीसी, मुथूट फायनान्स, मारुती सुझुकी यांचे समभाग तेजीत होते. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, पतंजली फुड्स, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि एसबीआय कार्ड यांचे समभाग घसरणीत होते.