सुडाच्या राजकारणाचा दंश
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी ‘द बॅलेट इज स्ट्राँगर दॅन द बुलेट’ म्हणजेच मतदान हे बंदुकीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटले होते. या विधानाची आठवण होण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालमधील कलिगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकांचा निकाल लागल्यानंतर घडून आलेला हिंसाचार. या निवडणुकीत विजयी झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराची विजयी मिरवणूक सुरू असताना सीपीआय(एम) समर्थकांच्या घरावर क्रूड बॉम्ब फेकण्यात आले. यामध्ये तमन्ना नावाची चार वर्षांची मुलगी मरण पावली. ही घटना केवळ दुर्दैवी आणि उद्वेगजनक नसून सडलेल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेल्या हिंसक संस्कृतीचे निदर्शक आहे.
लोकशाहीची जननी असणाऱ्या भारतात दीड-दोन दशकांपूर्वपर्यंत राजकीय सौहार्द-सलोखा, विरोधी मतांचा आदर करण्याची संस्कृती, विचारसरणीवर आधारीत विरोध राजकारणापुरता मर्यादित ठेवण्याचा शिरस्ता यांवर आधारीत वातावरण दिसत असे. परंतु आज टोकाची कटूता, आक्रमकपणा, विरोधी मतांना तुच्छ लेखण्याचा उद्दामपणा आणि त्याहून भयावह म्हणजे विजयाचा अतिउन्माद यांसारख्या अवगुणांनी ओतप्रोत भरलेलं वातावरण सर्वदूर दिसू लागलं आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये तर राजकीय वैमनस्य इतक्या पराकोटीला गेले आहे की, दिवसाढवळ्या विरोधकांच्या घरांवर हल्ले करण्यापासून मतदारांनाही मारझोड करण्याचे प्रकार घडताहेत. राजकीय हिंसाचार हे पश्चिम बंगालचे आजचे प्राक्तन बनले आहे.
अलीकडेच नदिया जिह्यातील कलिगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालादिवशी घडलेली घटना केवळ या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का देणारी आणि कोणत्या भयंकराच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, याची जाणीव करुन देणारी ठरली. तमन्ना खातून नावाची चौथी इयत्तेत शिकणारी एक अल्पवयीन मुलगी तृणमूल काँग्रेसच्या विजयी मिरवणुकीदरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी सीपीआय (एम)ला समर्थन देणाऱ्या मतदारांच्या घरावर फेकलेल्या एका क्रूड बॉम्बच्या स्फोटात मृत्युमुखी पडली. या मृत्यूमुळे पुन्हा एकदा बंगालच्या राजकारणातील तृणमूल काँग्रेसचा उन्माद आणि हिंसक चेहरा उघड झाला आहे.
ही घटना केवळ एक अपघात नव्हती, तर ती निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या राजकीय शत्रुत्वाचे आणि सूडाच्या भावना पोसणाऱ्या संस्कृतीचे एक विदारक उदाहरण होती. तमन्नाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब सीपीआय(एम)ला मतदान करते. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील जागेवर विजय मिळवल्यानंतर मोठी मिरवणूक काढली होती. यादरम्यान सीपीआय (एम) समर्थकांच्या घरांवर क्रूड बॉम्ब फेकण्यात आले. या हिंसाचारात तमन्नाचा मृत्यू झाला. यातून पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया आणि तिच्याशी निगडित हिंसाचाराचे भयावह वास्तव समोर येते. सीपीआय(एम)च्या राज्य सचिवांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत विजयी मिरवणुकीमध्ये मिठाई नाही, तर बॉम्ब वाटले गेले, असा आरोप करत याची तुलना दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. भाजपनेसुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हिंसेला खतपाणी घालण्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी अदर शेख, मनोवर शेख, कालू शेख आणि अन्वर शेख या चार संशयितांना अटक केली. मात्र, या प्रकरणाची चौकशी किती प्रामाणिकपणाने होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून सविस्तर अहवाल मागवला आहे. पण ही घटना फक्त स्थानिक पातळीवरील संघर्षाची नसून संपूर्ण राज्यव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रसंग होता.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने हिंदू मतांची मोजणी सादर करत या विषयाला एक नवीन आयाम दिला आहे. बंगालमधील भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी सांगितले की कलिगंजमधील सुमारे 1.10 लाख हिंदू मतदारांपैकी 72,600 मतदारांनी मतदान केले आणि त्यापैकी 52,710 मते भाजपला मिळाली. त्यांनी हेही सांगितले की भाजपने 106 पैकी 105 हिंदूबहुल बुथवर विजय मिळवला. हे हिंदू मतांचे अभूतपूर्व संख्यात्मक एकत्रीकरण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तृणमूलने हे दावे फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की कलिगंजमध्ये हिंदू लोकसंख्या फक्त 42-44 टक्के असून, त्यातील एकट्या भाजपने 52,710 मते मिळवणं अशक्य आहे. त्यामुळे या आकड्यांचा हेतुपुरस्सर गैरवापर झाल्याचा आरोप टीएमसीने केला.
या आकडेमोडीतील सत्य-असत्य काहीही असेल पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की बंगालमधील निवडणुकीचा फोकस मतांपेक्षाही धर्म, पक्षीय निष्ठा, विरोधी मतांचे दमन व सत्तेच्या दहशतीच्या माध्यमातून मांडला जातो. कलिगंजमधील पोटनिवडणूक ही एका अर्थाने महत्त्वाची होती. माजी आमदार नासिरुद्दीन अहमद यांच्या निधनानंतर त्यांची कन्या, आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या अलीफा अहमद, टीएमसीकडून उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी 91,000 मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस-डाव्या आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. टीएमसीला 55 टक्के मते मिळाली, भाजपला 28 टक्के तर काँग्रेसला 15 टक्के मते या निवडणुकीत मिळाली. या आकड्यांवरून हे स्पष्ट होतं की तृणमूल काँग्रेस अजूनही ग्रामीण आणि अल्पसंख्याक भागांमध्ये बळकट आहे. दुसरीकडे भाजपच्या जोरदार प्रचारानेही फारसा परिणाम झालेला नाही. मात्र कोणत्याही विजयाचा अर्थ विरोधात मतदान करणाऱ्यांचा गळा घोटणे, त्यांच्यावर हल्ले करणे असा होत नाही. लोकशाहीला तर ही बाब बिलकूल अभिप्रेत नाही. पण बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राजकीय अभय आणि वरदहस्त लाभल्याने टीएमसी कार्यकर्त्यांची अरेरावी पराकोटीला गेल्याचे मागील 10 वर्षांमध्ये सातत्याने दिसून आले आहे. दर निवडणुकीनंतर रक्त सांडणे, बॉम्बस्फोट, घरांची तोडफोड आणि हल्ले हे प्रकार घडताना दिसतात. सामान्य नागरिक, विशेषत: महिला व लहान मुले, या हिंसेत होरपळून जातात. तमन्ना खातूनचा मृत्यू हे त्याचं हृदयद्रावक उदाहरण आहे.
या घटनेवर सर्व राजकीय पक्षांनी केवळ टीका किंवा सहवेदना व्यक्त करण्यापलीकडे जाऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया ही कायद्याने, शांततेने आणि सामान्य नागरिकांच्या सहभागाने पार पडायला हवी. मात्र प्रत्यक्षात तिथं निवडणुकीच्या काळात लोकांना हिंसाचाराची भीती सदैव असते. दर निवडणुकीत पक्षीय ध्रुवीकरण होतं, आणि ज्या मतांनी सरकार निवडायचं असतं, त्याच मतदारांवर अत्याचार होतो. तमन्ना ही केवळ एक हिंसाचारातील बळी म्हणून करावयाची नोंद नव्हती. शाळेत जाणारी, खेळणारी-बागडणारी, आई-वडिलांची लाडकी मुलगी होती. कदाचित उद्या ती डॉक्टर, शिक्षक किंवा काहीतरी बनली असती. तिचा मृत्यू केवळ एका स्फोटात झाला नाही, तर तो एका सडलेल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेल्या हिंसक संस्कृतीत झाला. त्यामुळे तमन्नाच्या मृत्यूवर फक्त दु:ख व्यक्त करण्याने काहीही हाशिल होणार नाही. जबाबदारी स्वीकारणं, दोषींवर कठोर कारवाई करणं आणि राजकारणात माणुसकी, मानवता या मूल्यांची पुनर्स्थापना करणे हाच खरा मार्ग आहे.
-पोपट नाईकनवरे