छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार हे विधान हास्यापद
कोल्हापूर/ प्रतिनिधी :
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच ज्या काँग्रेसला विरोध केला, त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि हिंदूत्वाच्या विचारापासून कोसो दूर गेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर बांधणार असे विधान करणे हास्यापद असल्याची टिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
खासदार शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी बुधवारी दिवसभर डॉक्टर, उद्योजक, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका, गाठीभेटी घेवून संवाद साधला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
खासदार शिंदे म्हणाले, काहीजण मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमध्ये काय होते, पंधराशे रुपयांमध्ये जर घर चालत असेल तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मागे घेवू असे वक्तव्य करत आहेत. जे माझे कुटुंब माझी जाबाबदारी याच्या पलिकडे गेले नाहीत त्यांना सर्वसामान्य भगिनीसाठी असणार पंधराशे रुपयांच महत्त्व समजणार नाही. स्वत:च्या घरामधून कधी बाहेर न पडणाऱ्यांना पंधराशे रुपयांमध्ये काय होत हे कधीच समजणार नाही. कष्टकरी, सर्वसामान्य भगिनींसाठी पंधराशे रुपयांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर भगिनींना 2100 रुपये देण्याचे वचन दिले आहे. महायुतीचे सरकार हे देणारे सरकार आहे. योजनेबाबत संभ्रम करणारे केवळ घेणारे आहेत, त्यांना देण्याचे माहितच नाही. गेल्या सव्वा दोन वर्षात महायुती सरकारने रेकॉर्डब्रेक योजना राबविल्या. महाराष्ट्र आज अनेक क्षेत्रांमध्ये नंबर वन आहे. महाराष्ट्राला असेच पुढे घेवून जायचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पाठबळ देणाऱ्या महायुती सरकारच्या पाठीशी रहा, असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, युवासेनेचे प. महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित कदम, सत्यजित जाधव आदी उपस्थित होते.
महायुतीच्या सर्व जागा विजय होतील
कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पाहता सर्वच दहा विधानसभा मतदार संघात महायुतीला पोषक असे वातावरण आहे. सर्वच घटकांमधून महायुतील पाठबळ मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूरमधून महायुतीचे सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.