अर्थसंकल्पाचा राज्याला कोणताही फायदा नाही
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची टीका : बेंगळूरसाठी होत्या अपेक्षा
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा राज्याला कोणताही फायदा नाही, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सांगितले. अद्याप अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती घेतलेली नाही. आपल्या राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पाचा कोणताही फायदा नाही. मी ते पाहत होतो. महात्मा गांधीजींच्या नावावर असलेला मनरेगा योजना रद्द केल्यानंतर आता त्यांनी महात्मा गांधींच्या नावावर एक कार्यक्रम ठेवला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मनरेगा कायदा पुनर्संचयित केला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये 60:40 टक्के निधी वाटप सूत्राने लागू करण्यात आलेला नवीन ग्रामीण रोजगार कायदा व्हीजी-जी राम जी योजना लागू करता येणार नाही. या अर्थसंकल्पातून आपल्या राज्याला कोणताही मोठा वाटा मिळणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्पातून बेंगळूरसाठी अपेक्षा होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळूरला ‘जागतिक शहर’ म्हटले आहे. तथापि, केंद्र सरकारने त्यासाठी काय केले आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय अर्थसंकल्प कर्नाटकसाठी निराशाजनक : मंत्री हेब्बाळकर
केंद्र सरकारकडून कर्नाटकवर वारंवार अन्याय होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. रविवारी कोप्पळ येथे पत्रकारांशी बोलताना, कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून येऊनही सीतारामन यांच्याकडून कर्नाटकात येणारा निधी दिला जात नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने सर्वाधिक भाजप सदस्यांना निवडून दिले. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, जगदीश शेट्टर आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाचे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते निवडून येऊनही राज्यावर होणाऱ्या अन्यायाविऊद्ध बोलत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.