Weather News : पुढील 24 तासांत राज्यात हुडहुडी वाढणार ; हवामान खात्याचा अंदाज
कोल्हापूरसह राज्यात थंडीचा कडाका कायम
कोल्हापूर : राज्यात पुढील २४ तासांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका अद्याप कायम आहे. दिवसभर काही प्रमाणात ऊन जाणवत असले तरी सकाळी आणि विशेषतः पहाटेच्यावेळी गारठा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या सततच्या प्रवाहामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडी आहे. किमान तापमानात अधूनमधून चढ-उतार होत असले तरी एकूणच बंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जानेवारी महिन्यात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असली तरी गारठा पूर्णपणे कमी होणार नसल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.थंडीचा कडाका कायमरात्री गारठा वाढल्यामुळे लोकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागांत थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे.
त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, पहाटे आणि रात्रीच्या वेळेत बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. थंडीमुळे सर्दी, खोकला आणि इतर आजार बळावण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डिसेंबर महिन्याअखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, गारठ्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे..