For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्तासंघर्षात ‘राणे ब्रँड’ चालला, पण..!

06:11 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
सत्तासंघर्षात ‘राणे ब्रँड’ चालला  पण
Advertisement

कोकणातील नगरपालिकांच्या सत्तासंघर्षात रायगडमध्ये महायुतीतील विसंवाद आणि मतभेदांमुळे तेथे प्रस्थापितांना धक्के बसले. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चांगले सूर जुळवत सातपैकी सहा ठिकाणी महायुतीचा गुलाल उधळला. तर साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्गातील सत्तासंघर्षात आमदार नीलेश राणेंच्या रुपाने ‘राणे ब्रँड’ला चांगला प्रतिसाद मिळाला. कणकवलीत मात्र राणे ब्रँड राणेंवरच भारी पडला. कणकवलीत भाजपचे नगराध्यपदाचे उमेदवार पराभूत झाले. मंत्री नीतेश राणे यांच्यासाठी तो मोठा राजकीय धक्का ठरला.

Advertisement

आज महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं गेलं तर ‘ठाकरे ब्रँड’साठी मुंबईत महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसतात. मुंबईत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना आपला पुण्याचा गड राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीकडूनदेखील एकजुटीची तयारी केली जात असल्याचे चित्र आहे. त्यांचीदेखील बोलणी सकारात्मक वळणावर असल्याचे सांगितले जातेय. पुण्यात ‘पवार ब्रँड’चे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनी एकत्रित लढल्याशिवाय पर्याय नाही, हाच विचार दोन्ही बाजूने केला जातोय. याचाच अर्थ राजकारणात यशस्वी झालेला प्रत्येक राजकीय नेता सर्वप्रथम आपला पारंपरिक गड टिकवून ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेत असतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यादृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कार्यकर्ते दुभंगू नये. त्याचा फटका आपल्या पुढील राजकीय घोडदौडीवर होऊ नये, याची पुरेपूर काळजी राजकीय नेते घेत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या ‘होमपिच’वर विजयी कामगिरीसाठी ते अतिशय सावध भूमिका घेत असतात. विनाकारण अनावश्यक जोखीम पत्करण्याच्या मानसिकतेत ते नसतात. सिंधुदुर्गातही नेमका हाच राजकीय दृष्टिकोन समोर ठेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे यांनी पालिका निवडणुका महायुतीने व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली होती. पण सिंधुदुर्गात महायुती होऊ शकली नाही. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही मित्रपक्ष कणकवली, मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी या चारही ठिकाणी स्वतंत्रपणे लढले. महायुती तुटल्यानंतर नारायण राणे निवडणूक प्रचारात कुठेच सक्रीय दिसले नाहीत. मात्र मालवणसह कणकवलीत आपला पाठिंबा कुणाला यासंबंधीचा योग्य मेसेज कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न त्यांनी काही प्रसंगातून केला. मालवणात प्रचारसभेआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

Advertisement

तसेच कणकवलीतील भाजप उमेदवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राणेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यातून कणकवलीत ज्येष्ठ राणे आपले धाकटे चिरंजीव नीतेश राणे यांच्या बाजूने, तर मालवणात थोरले चिरंजीव नीलेश राणे यांच्या बाजूने असल्याचा संदेश राणे समर्थकांमध्ये नक्कीच गेला. पण याव्यतिरिक्त प्रत्यक्ष प्रचारात ज्येष्ठ राणे पूर्णत: अॅक्टीव्ह राहिले नाहीत. अन् त्याचाच फटका कुठेतरी मंत्री नीतेश राणे यांना कणकवलीत निश्चितपणे बसला. त्याचप्रमाणे आमदार नीलेश राणे यांच्या आक्रमक प्रचाराचा फायदा भाजपविरोधात एकवटलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या कणकवली शहर विकास आघाडीला झाला. तेथे नराध्यक्षपदी संदेश पारकर विजयी झाले. पारकर यांच्या विजयावर नीलेश राणे यांनी दिलेली प्रतिक्रिया बरेच काही सांगून गेली. मालवण आणि कणकवलीतील विजय म्हणजे ‘एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू’ अशा भावना नीलेश यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. कणकवलीतील निकाल मोठ्या आनंदाने स्वीकारणे त्यांना कठीण गेले, हे स्पष्ट झाले. कारण कणकवली हे त्यांच्या कनिष्ठ बंधूंचे ‘होमपिच’ आहे. मतदारसंघातील नगरपंचायत जिंकता न येणे हा कुठल्याही मंत्र्यासाठी ‘सेटबॅक’च असतो आणि राजकारणात आपल्यापेक्षा एक पायरी पुढे असलेल्या आपल्या भावाला सेटबॅक देण्यास आपणच कुठेतरी कारणीभूत ठरलो, अशी एक अपराधीपणाची भावना नीलेश यांच्या मनात निर्माण झालीय, त्याचेच ते द्योतक होते. कुटुंब म्हणून ही भावना स्वाभाविकच आहे. नीतेश राणेसुद्धा कणकवलीच्या निकालाने कमालीचे दुखावले गेले आहेत. कणकवलीत शहर विकास आघाडीच्या बाजूने नीलेश राणेंची एंट्री झाली नसती, तर चित्र वेगळे राहिले असते.

भाजपच तेथे जिंकले असते असे राणे समर्थकांकडून बोलले जात आहे. पण आता हाती आलेला निकाल स्वीकारून पुढे जाण्याशिवाय दोन्ही राणे बंधूंना पर्याय नाही. नगरपालिका निवडणुकांमध्ये युती न होण्यास रवींद्र चव्हाण कारणीभूत असल्याचा आरोप नीलेश राणे वारंवार करीत होते. त्यांनी भाजपविरोधात केलेल्या आक्रमक प्रचाराला मालवणात चांगला प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षासह शिवसेनेचे 10 नगरसेवक मालवणात निवडून आले. पण निवडणूक निकालानंतर भाजप हे आपलेच कुटुंब असल्याचा उल्लेख करीत त्यांनी झालेल्या गोष्टीवर पडदा टाकण्याची राजकीय प्रगल्भताही दाखवली. मतदानानंतर लगेचच झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन ‘मनोमिलना’चीही तयारी दाखवली. तरीपण आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युती होणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना आहे. कारण शेवटी सिंधुदुर्गात ‘राणे ब्रँड’चे वर्चस्व अबाधित ठेवण्यावर त्यांचा निश्चितच भर असेल.

रायगड जिल्ह्यात श्ऱीवर्धन आणि महाड नगरपालिका गमावल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला. तर उरण आणि कर्जतमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. मुरुड-जंजिरा नगरपालिकेतील पराभव शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यासाठी राजकीय धक्का ठरला. महायुतीतील घटक पक्ष एकमेकाविरोधात लढण्याचे हे परिणाम होते. रायगडात दहापैकी प्रत्येकी तीन नगर परिषदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी जिंकल्या. तर भाजप, शेकाप, ठाकरे सेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी एका नगर परिषदेवर विजय संपादन केला.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड या तीन नगरपरिषदा आणि गुहागर, देवरुख, लांजा या तीन नगर पंचायती शिवसेना-भाजप युतीने आरामात जिंकल्या. राजापूर नगरपरिषदेत मात्र युतीची जादू चालली नाही. तेथे महाविकास आघाडी वरचढ ठरली. काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी विजय खेचून आणत स्वत:चे वर्चस्व दाखवून दिले. राजापुरातील पराभव आमदार किरण सामंत यांच्यासाठी राजकीय धक्का मानला जात आहे. किरण सामंत निवडणूक नियोजन व प्रचारात काहीसे कमी पडले. रत्नागिरीत शिवसेना क्रमांक 1 चा पक्ष राहिला. उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरीत युती करण्यात यशस्वी झाले. सिंधुदुर्गात युती न होऊनसुद्धा चारपैकी दोन ठिकाणी भाजप, एका जागेवर शिवसेना आणि चौथ्या जागेवर शिवसेनेचा पाठिंबा असलेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. सिंधुदुर्गात युती तुटूनसुद्धा ठाकरे शिवसेनेला अपेक्षित कामगिरी साध्य करता आली नाही. मालवणात नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा रोवताना नीलेश राणेंना खूप संघर्ष करावा लागला. पण कणकवलीतील निकालानंतर राणेंच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवण्यात किंवा ‘राणे विरुद्ध राणे’ संघर्ष निर्माण करण्यात राणे विरोधकांना यश आलेय का, हा मुद्दादेखील तेव्हढाच चर्चेत आला आहे.

महेंद्र पराडकर

Advertisement

.