राज्यात फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाचा तडाखा
काही जिल्ह्यात 34 डिग्री सेल्शियसपर्यंत तापमानाची शक्यता
प्रतिनिधी/ .बेंगळूर
हिवाळ्याची थंडी दूर होते न होते तोवर राज्यात उन्हाच्या झळा हळूहळू वाढू लागल्या आहेत. बेंगळूरसह बहुतांश जिल्ह्यात आतापासूनच उन्हाची रखरख सुरू झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुरुवात आतापासूनच झाली की काय? असे प्रत्येकातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत उन्हाचा पारा 34 डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्याच्या अनेक भागात रात्री व पहाटेच्या वेळेस थंडी, त्यानंतर सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत कमालीचा उकाडा जाणवत आहे. वास्तविक 9 ते 10 मार्चपासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते. पण यावर्षी एक महिना अगोदरच म्हणजे सर्वसाधारणपणे 10 फेब्रुवारीपासूनच उकाडा जाणवू लागला आहे.
बेळगाव, बागलकोट, बिदर, कारवार, गदग, हावेरी, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी जिल्ह्यांमध्ये उष्मा वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 34 डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दावणगेरी जिल्ह्यात सध्या अत्यंत कमी म्हणजे 14 डिग्री सेल्शियसपर्यंत तापमान आहे.
कारवार, मंगळूर, उडुपी, बळ्ळारी, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, हासन, कोडगू, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर, शिमोगा, तुमकूर, विजयनगर या जिल्ह्यांमध्येही तापमान वाढीची शक्यता आहे. राजधानी बेंगळूरसह राज्याच्या अनेक भागात सध्या तापमानाने 30 अंश डिग्री सेल्शियस ओलांडले आहे. उकाडा वाढत असल्याने थंड पेयजले घेण्याकडे ओढा वाढला आहे. फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाच्या झळा वाढत असल्याने एप्रिल-मे दरम्यान स्थिती काय असेल, याचा अंदाज करणे अद्याप तरी शक्य नाही.