राज्यात पर्यटकांची अलोट गर्दी
दिल्लीतील प्रदूषण गोव्याच्या पथ्यावर : सोशल मीडिया अपप्रचाराचाही परिणाम नाही
प्रतिनिधी/ पणजी
जगातील अनेक देश सध्या प्रचंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. पैकी काहींनी त्यावर नियंत्रण मिळविण्यात समाधानकाररित्या यशही मिळविले असले तरी भारतातील दिल्ली राज्याचा पाय मात्र दरवर्षी अधिकाधिक खोलात जात आहे. येथील प्रदूषणाच्या पातळीने कहर केला असून तेथील नागरिकांचे जीवन असह्य बनले आहे.
या संकटावर किमान काही दिवसांसाठी मात म्हणून जे सुखवस्तू लोक आहेत ते अन्य राज्यांमध्ये जातात किंवा जाऊ शकतात. गरीबांसमोर कोणताही पर्याय नसल्याने त्यांचे मात्र हाल होतात. अशा काही सुखवस्तू लोकांनी सध्या गोव्याची वाट धरली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गोव्यात दिल्लीश्वरांची गर्दी वाढू लागली आहे. एका अर्थाने दिल्लीतील प्रदूषण गोव्याच्या पथ्यावर पडले आहे.
एरव्ही हल्लीच्या काही दिवसांमध्ये गोव्यात पर्यटन क्षेत्रात घडलेल्या अनेक अघटीत घटनांमुळे कटू अनुभव घेतलेल्या कित्येक पर्यटकांनी ‘पुन्हा येथे कधीच येणार नाही’, अशी शपथ घेतल्याचे व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यातील पर्यटनास ओहोटी लागते की काय? असा सवाल आणि पर्यटन व्यावसायिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. परंतु दिल्लीतील हवा प्रदूषणाने या धंद्याला सुगीचे दिवस आणून दिले असून परिणामस्वरूप राज्यात पर्यटकांच्या संख्येत ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा गतवर्षीपेक्षा दुप्पट संख्येने पर्यटक दाखल झाले असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे.
देशी पर्यटकांची संख्या वाढती
खाणी बंद पडल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेची मदार पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या व्यवसायात जी अंदाधुंदी, पावलोपावली लूट, फसवणूक, हाणामारी यासारख्या कारणांमुळे राज्याची बऱ्याचअंशी बदनामी झाली आहे. त्यात भर म्हणून बेकायदेशीररित्या चालणारे बर्चसारखे क्लब आणि खुलेआम लुटणारे किनारी भागातील कॅसिनो यांच्या कार्यपद्धतीला बळी पडलेल्या पर्यटकांकडून विविध समाज माध्यमांच्या आधारे गोव्याची बदनामी चालविण्यात आली होती. त्याचा फटका पर्यटन व्यवसायास बसेल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु तसे काहीच न होती उलटपक्षी पर्यटकांची आणि खास करून देशी पर्यटकांची संख्या वाढतच असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
राज्यात 6.23 टक्के पर्यटनात वाढ
प्राप्त आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर 2025 यादरम्यान राज्यात 6.23 टक्के एवढी पर्यटन वाढ झाली आहे. त्यात देशांतर्गत आवक 5.36 टक्के वाढली आहे. वर्ष 2024 मध्ये असलेल्या 69,24,938 संख्येच्या तुलनेत 2025 मध्ये ती 72,96,068 एवढी झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय आवक 29.33 टक्क्यांनी वाढली असून वरील कालावधीतच ती संख्या 2,59,820 वरून 3,36,031 वर पोहोचली आहे. या वाढीचा आलेख चढता ठेवण्यात नवीन विमानसेवांचेही योगदान मिळाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर 2025 मध्ये रशिया, नोवोसिबिर्स्क, मॉस्को, कझाकिस्तान, आदी देशांमधून 34 चार्टर्ड विमानांची ये-जा झाली. त्याशिवाय रेल्वे आणि स्ववाहनांच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या तर असंख्य आहे. अशावेळी ऑनलाइन माध्यमातून गोवा संकटात असल्याचा किंवा अधोगतीकडे जात असल्याचा कितीही अपप्रचार करण्यात येत असला तरीही पर्यटकांच्या संख्येत कोणताही फरक पडलेला नाही. उलटपक्षी त्या संख्येत वाढच नोंद होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.