राज्य शासनाकडून शिवपुतळ्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू
राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारणार
सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
मालवण / प्रतिनिधी
राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे. राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या. शिवपुतळा घाईगडबडीत उभारण्यात आल्याची टीका अनेकांनी केली होती. राज्य शासनाच्या वतीने नव्याने शिवपुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च गृहीत धरण्यात आला आहे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे.