राज्य सरकारला आज दोन वर्षपूर्ती
होस्पटेमध्ये ‘समर्पण संकल्प मेळावा’ : 1 लाखहून अधिक लाभार्थ्यांना हक्कपत्रांचे वितरण
प्रतिनिधी / बेंगळूर
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य काँग्रेस सरकारला मंगळवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर 20 मे रोजी विजयनगर जिल्ह्याच्या होस्पेट येथील जिल्हा क्रीडांगणावर ‘समर्पण संपल्प मेळावा’ आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमात 1 लाखहून लाभार्थ्यांना महसूल खात्यातर्फे मालमत्तेची हक्कपत्रे वितरित केली जाणार आहे.
20 मे 2023 रोजी राज्य काँग्रेस सरकार अस्तित्वात आले होते. मंगळवारी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आयोजित समर्पण संकल्प मेळाव्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मंत्री, काँग्रेसचे आमदार, खासदार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमस्थळी 2 लाखांपेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.
‘भू-गॅरंटी’ योजनेद्वारे हक्कपत्रे : शिवकुमार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी होस्पेट येथील मेळाव्याच्या पूर्वतयारीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकार नेवळ दोन वर्षेपूर्तीबद्दल आनंदोत्सव साजरा करत नाही. जनतेला ‘भू-गॅरंटी’ योजनेद्वारे 1 लाखांपेक्षा अधिक जणांना जमिनीची कागदपत्रे वितरित करणार आहे. हाडी, हट्टी, तांडांमध्ये घरे बांधलेल्या कुटुंबांना जमिनीचे मालकी हद्द देण्यात येणार आहे.
शंभर वर्षांत न झालेली कामे आमच्या सरकारने महसूल खात्यामार्फत केली आहेत. महसूल खात्यामार्फत हक्कपत्रे वितरित करण्याची योजना इतिहासात समाविष्ट होईल. प्रत्येक व्यक्तीला आपण वास्तव्य करीत असलेली जागा स्वत:च्या मालकीची असावी, अशी इच्छा असते. अनुसूचित, मागास आणि भूमिहीन असणाऱ्यांसाठी आपल्या सरकारने साहाय्य केले आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात 20 कोटी रु. खर्च करून हक्कपत्रे वितरणाचा कार्यक्रम आयोजिला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी कशी करावी, हे ठाऊक नसल्याने ही योजना सोडून दिली होती. मात्र, महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा व त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी अध्ययन करून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला आहे. 4 हजार फुटापर्यंतच महसूल किंवा खासगी जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेली जमीन सरकारच्या ताब्यात घेऊन तहसीलदारांमार्फत उपनोंदणी करून संबंधितांना मोफत वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. 1 लाख 11 हजार 111 मालमत्तेची कागदपत्रे तयार असून संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांमार्फत हक्कपत्रे वितरित केली जातील, असेही शिवकुमार यांनी सांगितले.
होस्पटेमधील जिल्हा क्रीडांगणापर्यंत लाभार्थी, कार्यकर्ते व लोकांना पोहोचविण्यासाठी परिवहनच्या बसेस बुकींग करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तर कर्नाटक भागात बससेवेत व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातून प्रत्येकी 200, यादगिरीतून कल्याण कर्नाटक परिवहनच्या 76 बसेस बुकींग करण्यात आल्या आहेत.