राज्याला हंगामी मुख्यमंत्र्यांची गरज नाही!
भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांची टिप्पणी
बेंगळूर : राज्याला हंगामी मुख्यमंत्र्यांची गरज नाही, शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडवणारे मुख्यमंत्री आणि सरकार हवे आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले. शेतकरीविरोधी काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलनाला दावणगेरे येथे प्रारंभ करताना ते म्हणाले, राज्याला हंगामी मुख्यमंत्री, तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांची गरज नाही. राज्यातील जनतेला सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदी राहतील की दुसरे कोणी मुख्यमंत्री बनतील, यात रस नाही. बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारे मुख्यमंत्री आणि सरकार असावे, अशी जनतेची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. बेळगावमध्ये निमित्तमात्र अधिवेशन घेऊ नका. कोणत्या उद्देशाने अधिवेशन घेणार आहे, हे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट करावे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या बेंगळूर किंवा दिल्लीमध्ये सोडवाव्यात. त्यांच्या समस्येमुळे राज्यातील जनतेसमोर अडचणी निर्माण होऊ नयेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेले विधान पाहिले तर ते हतबल असल्याचे दिसून येते. 50 वर्षांपासून राजकारणात असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी यापूर्वीही असहाय्यपणे वक्तव्ये केली आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे भविष्य जनता ठरवत नाही तर विदेशात कुठेतरी बसलेले राहुल गांधी निर्णय घेतील, असे खोचक टिप्पणीही विजयेंद्र यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यास असमर्थ असलेले कोणतेही सरकार उलथवून टाकण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची झळ बेंगळूरमधील विधानसौधपर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी सरकारने ऊस उत्पादक आणि मका उत्पादकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.