For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाद शृंगेरी विधानसभेचा!

06:48 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाद शृंगेरी विधानसभेचा
Advertisement

कर्नाटकाच्या शृंगेरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचा वाद संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. बुधवारी मतमोजणीचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयात सादर करा, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला होता, तथापि हा व्हिडिओ आपल्याला सापडत नाही असा दावा निवडणूक आयोगाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय संतापले. हे रेकॉर्ड्स गायब कसे झाले? असा सवाल करीत पुढील सुनावणीच्या दरम्यान सारी माहिती तसेच संबंधित मतमोजणीचा व्हिडिओ सर्वोच्च न्यायालयात सादर कराच, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने खरडपट्टी काढेपर्यंत खरे तर निवडणूक आयोगाने वाट पाहण्याची गरज नव्हती. मात्र निवडणूक आयोग गांभीर्याने काही गोष्टी घेत नाही, त्याचा हा परिपाक ठरला आहे. कर्नाटकातील शृंगेरी विधानसभा मतदारसंघात 2023 मध्ये  निवडणुकीच्या दरम्यान मतदान घेतले होते. काँग्रेसचे नेते टी. डी. राजेगौडा यांनी भाजपचे उमेदवार डी. एन. जीवराज यांचा अवघ्या 201 मतांच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर जीवराज यांनी सदर निकालाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 6 एप्रिल रोजी टपाल मतांची पुन्हा मोजणी करण्यास आणि नाकारण्यात आलेल्या 219 टपाल मतांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. 3 मे 2024 रोजी निवडणूक अधिकाऱ्याने जो नवा निकाल दिला, त्यामध्ये राजेगौडा यांची तब्बल 255 मध्ये कमी झाली होती. भाजपचे डी. एन. जीवराज विजयी म्हणून घोषित करण्यात आले. आमदारकी गेल्यामुळे राजेगौडा संतप्त झाले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने केवळ 279 टपाल मतांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र निवडणूक अधिकाऱ्याने बेकायदेशीरपणे राजेगौडा यांना पडलेल्या 562 वैध टपाल मतांचीही पुन्हा तपासणी केली. भाजप नेते जीवराज यांच्यावर टपाल मतपत्रिकांशी छेडछाड केल्याप्रकरणी या अगोदर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र मे महिन्यात कर्नाटक उच्च न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यातच राजेगौडा याला मोठा दिलासा देऊन सर्वोच्च न्यायालयात या विषयावर सुनावणी चालू असेपर्यंत शृंगेरीचे आमदार म्हणून राजेगौडा हेच काम पाहतील, असा आदेश दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान राजेगौडा यांनी आधी झालेल्या मतमोजणीचे व्हिडिओ तसेच नुकत्याच झालेल्या फेरमतमोजणीचे व्हिडिओ आणि निवडणूक निरीक्षकांचा अधिकृत अहवाल दाखविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यासाठी आदेश दिला होता. मात्र आपल्याकडे आता तो व्हिडिओ सापडत नाही, अशा आशयाचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी 2027 रोजी होणार असून तोपर्यंत निवडणूक आयोगाला आवश्यक ते सर्व कागदपत्र, रेकॉर्ड हे सर्वोच्च न्यायालयात सादर करावे लागतील. संतप्त सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कागदपत्रे किंवा या संदर्भातील रेकॉर्ड्स गायब झालेच कसे? असा सवाल केला आहे. नि:पक्षपातीपणे निवडणुका घेणे हे तुमचे काम आहे आणि त्यामुळे या संदर्भातील अधिकृत सारे रेकॉर्ड्स तुमच्याकडे असायलाच हवेत. त्यामुळे हे रेकॉर्ड आम्ही आता शोधत आहोत, असे सांगण्याचा प्रश्न येतोच कुठून? की तुम्ही विजयी उमेदवाराला ते देऊन टाकले का? असा सवाल केला आणि कोणत्याही परिस्थितीत पुढील सुनावणीच्यावेळी ते न्यायालयासमोर सादर करा, अन्यथा कठोर कारवाई करावी लागेल. कोणतेही कारण ऐकून घेणार नाही, असा कडक इशारा देखील सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिलेला आहे. निवडणुका झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड हा काही वर्षे ठेवावा लागतो. कायद्यात त्याची तरतूद आहे, असे असताना हे रेकॉर्ड गायब कसे होतात? प्रश्न एका विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशाचा हा प्रश्न होतो. अलीकडे जो तो उठतो सुटतो निवडणूक आयोगावर घसरत राहतो आणि अशावेळी एखाद्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोग आपल्याकडे रेकॉर्ड उपलब्ध नाही, असे जेव्हा सांगते त्यावेळी संशयाला जागा निर्माण होते. निवडणूक आयोगाचा कारभार हा स्वच्छ आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.