काँग्रेस फुटीर आमदारांविरोधातील निवाडा सभापतींनी ठेवला राखून
पणजी : काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांविरोधात पक्षाचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून सभापती रमेश तवडकर यांनी त्यावरील निवाडा राखून ठेवला आहे. येत्या सोमवारपर्यंत याचिकादार तसेच प्रतिवादी यांना लेखी बाजू सादर करण्याची मोकळीक दिली आहे. त्या लेखी बाजूची दखल घेतल्यानंतर निवाडा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापूर्वी डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेली अपात्रता याचिका सभापतींनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे गिरीश चोडणकर यांची याचिका फेटाळली जाणार अशीच चिन्हे दिसत आहेत. सदर याचिकेसह गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांची याचिका सभापतींकडे निवाड्यासाठी प्रलंबित आहे.
याचिकादार तसेच प्रतिवादीतर्फे अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून आता फक्त निवाडा देण्याचे काम तेवढे बाकी आहे. आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई, केदार नाईक, ऊडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर यांनी वेगळा गट कऊन काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या गटाचे भाजपमध्ये विलिनीकरण झाल्याचे सांगितले होते. पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेऊन त्या फुटीर आठ आमदारांना अपात्र करण्याची मागणी चोडणकर यांनी याचिकेतून सभापतींकडे केली होती. त्यावरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. आता पुढील आठवड्यात केव्हाही त्यावरील निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणी धक्कादायक किंवा ऐतिहासिक निकाल लागण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे.