विकासाचे उदाहरण ठरलेले स्पॅनिश मॉडेल
युक्रेन युद्ध, स्थलांतर समस्या, आंतरराष्ट्रीय आयात कर प्रणालीस बसणारे धक्के, मध्यपूर्वेतील अस्थिरता व इंधनाचे चढते दर या कारणांमुळे युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्था संकटांचा सामना करीत असताना स्पेनच्या अर्थव्यवस्थेने उत्तम प्रगती साधली आहे. ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रतिष्ठीत मासिकाने 2024 साली जगात सर्वोत्तम कामगिरी बजावणारी अर्थव्यवस्था म्हणून स्पेनची निवड केली आहे. युरोपमधील चौथी मोठी अर्थव्यवस्था मानल्या गेलेल्या स्पेनने सकल राष्ट्रीय उत्पन्नात गतवर्षी 3-2 टक्के वाढ नोंदवली आहे.
स्पेनची ही अर्थव्यवस्थेतली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद म्हणता येण्यासारखी आहे. याचवर्षी जर्मनीची अर्थव्यवस्था 0.2 टक्क्यांनी कमी झाली. फ्रान्स, इटली व ब्रिटनचा विकास दर किरकोळ प्रमाणात वाढला. गेल्या काही वर्षांपासून स्पेनच्या निर्यातीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. आर्थिक विकासात सेवा क्षेत्राने मोलाचा वाटा उचलला. स्पेनच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान असलेले पर्यटन क्षेत्र कोरोना काळात रसातळास गेले होते. आता त्याने मोठीच भरारी घेतली आहे. गतवर्षी स्पेनला 94 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली. पर्यटक भेटीबाबत तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. पर्यटनामुळे ग्राहक संख्या वाढली. पर्यटन क्षेत्रातील सेवा, विक्री, विनिमयास मोठी चालना मिळाली. तुलनात्मकरित्या अनिवासी ग्राहकांकडून निवासी ग्राहकांपेक्षा 40 टक्यांहून अधिक खर्च करण्यात आला. जो स्थानिकांची क्रयशक्ती वाढवणारा व महसूलास हातभार लावणारा ठरला. निवासी हॉटेल व्यवसायात गुंतवणूक वाढली. पर्यटन क्षेत्रातील सेवा निर्यातीमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नवृद्धीस मोलाची मदत झाली.
स्पेनच्या उत्पादन व निर्यात क्षेत्रात वाहने, वाहन सुटे भाग निर्मिती, आरेखन व संलग्न विभागांचा प्रमुख सहभाग आहे. निर्यातीत शुद्धीकृत पेट्रोलियम घटक, रसायने, वस्त्राsद्योग, ऑलिव्ह तेल, पेये, प्राणीमांस, औषधे यांचाही अंतर्भाव होतो. स्पेनच्या औद्योगिक क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार निर्मितीत एक पंचमांश वाटा आहे. वाहने व संलग्न घटक निर्मितीत स्पेन हा युरोपात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातील एकूण उत्पादनांपैकी 60 टक्यांपेक्षा अधिक उत्पादन निर्यात होते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार प्रणाली या नव्या उद्योगात स्पेनने उच्च वाढीची क्षमता दर्शविली आहे. अन्न प्रक्रिया, लोह, पोलाद, नौदल यंत्रसामुग्री हे निर्यातक्षम उद्योग बनले आहेत. स्पेनच्या औद्योगिक क्षेत्राने 2024 साली इतर युरोपियन देशांच्या तुलनेत उल्लेखनिय विकास साधला आहे.
स्पेनच्या एकूण विकासात शेती क्षेत्राचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे. हा देश सुमारे दहा लाख कृषी व पशूधन व्यवसायांचे केंद्र आहे. स्पेन जगातील सर्वात मोठा ऑलिव्ह तेल उत्पादक देश आहे. वाईन उत्पादनात तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. संत्री व स्ट्रॉबेरी उत्पादनात जागतिक पातळीवर त्याने वरचा क्रमांक गाठला आहे. याच बरोबरीने गहू, साखर, बीट, बार्ली, टोमॅटो, लिंबू, मोसंबी, द्राक्षे ही पिके घेण्यातही कृषी क्षेत्र अग्रेसर आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून गतवर्षी स्पेनचे कृषी उत्पन्न 37 अब्जाहून अधिक युरेंवर पोहचले. ज्याची वाढ 2023 सालाच्या तुलनेत 14 टक्याने जास्त आहे. ही वाढ मुख्यत्वे कमी उत्पादन खर्च आणि दर्जेदार कृषी उत्पादनांमुळे वाढती मागणी व वाढत्या मुल्यामुळे झाली आहे. परिणामी, कृषी क्षेत्रात रोजगारही गतवर्षी 1.5 टक्यांनी वाढला आहे. मेंढ्या व डुकरे या पशूधनाचा स्पेनचा वाटा युरोपियन संघात 25 टक्के इतका मोठा आहे. पशुपालन आणि मांस निर्यातीसह मत्स्यशेती व मच्छीमारीचा व्यवसाय उन्नत होत आहे.
स्पॅनिश अर्थव्यवस्थेच्या विकासाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे सार्वजनिक क्षेत्रावरील खर्चात सरकारने केलेली योजनाबद्ध वाढ. यासाठी युरोपियन संघाच्या ‘पुढील पिढी निधी’ उपक्रमाचा यथोचित वापर करण्यात आला. कोरोना आपत्तीनंतर सरकारद्वारे सार्वजनिक सेवांवरील खर्चास विशेष प्राधान्य देण्यात आले. विशेषत्वाने राष्ट्रीय रेल्वे, शहर विकास, पायाभूत सुविधा यावर अधिक खर्च करण्यात आला. विद्युत वाहन उद्योग, छोटे व्यवसाय, अक्षय ऊर्जा यासाठी भरीव अनुदानांची तरतूद करण्यात आली. या धोरणांचा परिणाम स्पेनमधील बेरोजगारी दर घटण्यात झाला. बेरोजगारी हे स्पॅनिश अर्थव्यस्थेचे मोठेच दुखणे होते. युरोपियन संघ सदस्य देशात स्पेनच्या बेरोजगारीचा दर सर्वाधिक होता. परंतु चौफेर विकासामुळे 2024 अखेरपर्यंत हा दर 10.6 टक्यापर्यंत खाली आला. गेल्या 14 वर्षांतील सर्वात कमी बेरोजगारी दर स्पेनने गाठला आहे. दोन वर्षांपूर्वी तो 13 टक्यांपर्यंत होता. साडेचार कोटींहून जास्त लोकसंख्या असलेल्या स्पेनमध्ये रोजगार प्राप्त लोकांची संख्या आता 2 कोटी 20 लाखांवर गेली आहे. गतीशील अर्थव्यवस्थेने गाठलेला हा मैलाचा दगड ठरला. खालावत चाललेला रोजगार सावरण्यासाठी स्पॅनिश सरकारने कामगार सुधारणा धोरण लागू केले. यामुळे कामगारांच्या तात्पुरत्या कंत्राटी वापरावरील निर्बंध वाढले. कायमस्वरूपी कामगार करार विषयक नीती नियमात लवचिकता आली. रोजगार निर्मितीस अडथळा न येता स्थिर रोजगार वाढवण्यावर भर देण्यात आला.
युरोपातील अनेक देशात आणि अमेरिकेत स्थलांतरितांविरोधात ओरड व कारवायांचे सत्र सुरू असताना, स्पेनच्या आर्थिक विकासात स्थलांतरीत श्रमशक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका दिसून येते. एकीकडे घटता जन्मदर तर दुसरीकडे वयस्करांची वाढती संख्या यातून युवा श्रमशक्तीची कमतरता ही स्पेनपुढील समस्या आहे. स्पेनच्या सेंट्रल बँकेने अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार येत्या 30 वर्षात स्पेनला देशांतर्गत कामगार कमतरता भरून काढण्यासाठी 25 दशलक्ष स्थलांतरीतांची गरज भासणार आहे. स्पेनमधील डाव्या राजवटीने देशाच्या आर्थिक विकासासाठी स्थलांतरीतांना महत्त्वाचे मानले आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी, ‘स्थलांतरीत, संपत्ती, विकास व संपन्नतेचे प्रतिनिधीत्व करतात, स्थलांतरीत कामगारांचे योगदान आमच्या अर्थव्यवस्थेसाठी सामाजिक सुरक्षा प्रणाली व पेन्शन योजने इतकेच महत्त्वाचे आहे’ असे सूचक विधान या संदर्भात केले आहे. त्यांच्या आघाडी सरकारला कोणतीही कागदपत्रे नसलेल्या पाच लाखापर्यंत स्थलांतरीतांना कायदेशीर दर्जा देण्याचा ठराव संसदेत संमत करायचा आहे.
स्पॅनिश अर्थव्यवस्थेच्या चढत्या आलेखाचे बरेच श्रेय गेल्या सहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या पेद्रो सांचेझ यांच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश सोशालिस्ट वर्कर्स पार्टी प्रणित सरकारला जाते. संपूर्ण युरोपास आव्हानात्मक ठरलेल्या गेल्या काही वर्षात तेथील राजकीय कल उजवीकडे झुकला आहे. अशा परिस्थितीत स्पेनने युरोपियन सत्तांपुढे एक उत्तम डावे लोकशाही विकास प्रारूप उभे केले आहे. किमान मूलभूत उत्पन्न योजना, महागाई कमी करण्यासाठीचे प्रयत्न, कामगार सुधारणा कायदे, गर्भपात विषयक कायद्यात सुधारणा, महिलांसाठी मासिक पाळी रजा व सुरक्षा विषयक सुविधा, अन्न पुरवठा व वितरण योजना, लैंगिक गुन्हेगारीसाठी कडक कायदे, आरोग्य विषयक सुधारणा, नैसर्गिक आपत्ती निवारण व्यवस्थापनात सुधारणा याद्वारे समाजस्वास्थ टिकवण्यात सरकारने मिळवले आहे. वारंवार अस्थिरतेकडे जाणारे आघाडी सरकारचे नेतृत्व करीत, सत्ता टिकवत, कठिण परिस्थितीतून देशास बाहेर काढणारी पंतप्रधान सांचेझ यांची कामगिरी जगापुढे नवे उदाहरण घालून देणारी ठरली आहे.
-अनिल आजगावकर