रेल्वेचे दक्षिण प्रवेशद्वार ठरतेय कुचकामी
मुख्य प्रवेशद्वाराला प्रवाशांची गर्दी : रेल्वेचा निधी वाया गेल्याची चर्चा
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करताना रेल्वे स्थानकाला दक्षिण बाजूनेही प्रवेशद्वार करण्यात आले. परंतु मोजकेच प्रवासी या प्रवेशद्वाराचा वापर करत असल्याने रेल्वेचा हा निधी वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता अत्यंत निमुळता असल्याने प्रवासी मुख्य प्रवेशद्वारानेच रेल्वे स्थानकात ये-जा करत आहेत. दोन वर्षांपूर्वी 190 कोटी रुपये खर्च करून रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करताना नवीन अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने, नवीन प्लॅटफॉर्म, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले. मुख्य प्रवेश द्वारानजीक प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागात नवीन प्रवेशद्वार करण्यात आले. यामुळे बेळगावच्या दक्षिण भागातील प्रवाशांना या प्रवेशद्वारामार्गे रेल्वे स्थानकामध्ये ये-जा करता येईल.
रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले तरी दक्षिण प्रवेशद्वार काही दिवस उशिराने सुरू झाले. याठिकाणी एक तिकीट काऊंटरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेषत: रात्रीच्यावेळी तुरळक प्रमाणात दक्षिण प्रवेशद्वारानजीक गर्दी असते. दिवसभर मात्र या प्रवेशद्वारातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असल्याने रेल्वेचा निधी वाया गेला का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गुडशेड रोडवर असणाऱ्या या प्रवेशद्वाराला जाण्यासाठीचा मार्ग अत्यंत निमुळता आहे. तसेच वाहन पार्किंगसाठी जागाही कमी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी मुख्य प्रवेशद्वारातूनच ये-जा करीत असतात. मुख्य प्रवेशद्वारानजीक पे अँड पार्किंग तसेच इतर सुविधा असल्यामुळे प्रवाशांची गर्दी मुख्य प्रवेशद्वारालाच होत आहे. भविष्यातील विचार करून जरी दक्षिण प्रवेशद्वार करण्यात आले असले तरी तुर्तास तरी अत्यंत तुरळक गर्दी दिसून येत आहे.