For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | शिये-बावडा रोडवर घुमतोय लाकडी रसवंतीच्या घुंगरांचा आवाज!

04:23 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   शिये बावडा रोडवर घुमतोय लाकडी रसवंतीच्या घुंगरांचा आवाज
Advertisement

                         शियेतील अमर नाईक यांची बैलाची लाकडी रसवंती

Advertisement

शिये ( सतीश पाटील )-जिद्द आणि कल्पकता असेल तर पारंपरिक व्यवसायातूनही यशाची नवी शिखरे सर करता येतात, हे करवीर तालुक्यातील शिये येथील तरुण व्यावसायिक अमर नाईक यांनी सिद्ध करून दाखवले आहे.यांत्रिक युगात मागे पडत चाललेली 'बैलाची लाकडी रसवंती' सुरू करून त्यांनी केवळ आरोग्याचा मंत्र दिला नाही, तर नवोद्योजकांसाठी एक नवा आदर्शही उभा केला आहे.

शिये बावडा रोड वरून ये -जा करताना बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आणि लाकडी घाण्याभोवती फिरणारा बैल हे दृश्य हमखास लक्ष वेधून घेते.येथे वैभव व अमर या नाईक बंधूंचा नाईक धाबा आहे. व्यावसायिक वृत्ती असलेल्या अमर नाईक हे आपल्या मित्राबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात सहलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी लाकडी रसवंतीचा घाना बघितला आणि त्यांना आपल्या भागात अशा प्रकारच्या रसवंतीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.आणि त्यांनी आजच्या काळात सर्वत्र विजेवर चालणाऱ्या लोखंडी घाण्यातून ऊसाचा रस काढला जातो.

Advertisement

मात्र,या प्रक्रियेत वेगामुळे रसाची चव आणि त्यातील नैसर्गिक सत्वे कमी होतात, असे मानले जाते. हीच बाब लक्षात घेऊन परंपरा आणि शुद्धता याचा मेळ घालत जुन्या काळातील लाकडी रसवंती सुरू केली.बैलाच्या साहाय्याने संथ गतीने फिरणाऱ्या या लाकडी रसवंतीतून निघणारा रस हा अधिक चविष्ट,थंड आणि आरोग्यदायी असतो.अमर नाईक यांचा हा उपक्रम 'गोड' तर आहेच, पण त्यामागे एक व्यावसायिक दूरदृष्टीही आहे. या व्यवसायासाठी विजेची गरज नाही, त्यामुळे हा पूर्णपणे पर्यावरणपूरक व्यवसाय आहे.आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक आता नैसर्गिक आणि हायजेनिक पर्यायांकडे वळत आहेत,

त्यामुळे अशा रसवंतीला मोठी मागणी आहे. आपल्या या उपक्रमाला त्यांनी अतिशय आकर्षक स्वरूप दिले आहे. सजवलेला बैल,सुबक लाकडी घाना आणि स्वच्छ परिसर यामुळे ग्राहकांसाठी हे केवळ रसवंती केंद्र न राहता आकर्षक ठिकाण बनले आहे. त्यांच्या या रसवंतीचा रस चाखण्यासाठी शिये परिसरासह कोल्हापूर शहरातूनही ये -जा करणारे लोक नाईक यांच्या शिये बावडा रोडवरील रसवंती वर गर्दी करत आहेत.

Advertisement
Tags :

.