For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा

06:37 AM Oct 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, अर्जुना आप्तस्वकीयांचा किंवा कोणाचाही मृत्यू झाल्यास त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही, कारण आत्मा हे प्रत्येकाचे मूळ स्वरूप असून ते कधीच नष्ट होत नाही. विश्वात दिसणारे सर्व पदार्थ मायेमुळे आकाराला आलेले आहेत. अर्थातच हे आकार तात्पुरते असतात आणि कालांतराने ते नष्ट होतात. ज्याना ह्या ब्रह्मचैतन्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तळमळ लागून राहते, त्यांना विषयात गम्य वाटत नाही. आत्मस्वरुपाला जाणल्यावर ते देहाचे तसेच समोर दिसणाऱ्या जगाचे अस्तित्व विसरून जातात. असे असताना भगवंत म्हणतात, कुणी आत्म्याला बघितल्याचे सांगतो हे एक आश्चर्य होय. तर कुणी त्याचे वर्णन करतो हेही आश्चर्यच. ह्याहून आश्चर्य म्हणजे ते वर्णन ऐकून मी आत्म्याला जाणले असे कुणी म्हणतो पण कुणाला काहीच समजलेले नसते, ह्या अर्थाचा आश्चर्य जो साच चि ह्यास देखे । आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ।  आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ।  29 । हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार आत्मा ही जाणून घेण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मीठ पाण्यात विरघळल्यावर स्वत:चे अस्तित्व विसरते त्याप्रमाणे जे आत्म्याला अनुभवतात ते देहाचे तसेच समोर दिसणाऱ्या जगाचे अस्तित्व विसरून जातात. त्यामुळे त्यांनी जाणलेल्या आत्म्याचे वर्णन ते करणार तरी कसे आणि कुणापुढे असा प्रश्न येतो म्हणून आत्म्याला ज्यांनी जाणले आहे ते त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत.

आत्म्याबद्दल अधिक सांगताना भगवंत पुढे म्हणतात, हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असणारा हा आत्मा सर्वदा अमर आहे म्हणून तू कोणत्याही प्राणिमात्राच्या देहनाशाबद्दल कधीही शोक करू नकोस.

Advertisement

वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा ।

म्हणूनी भूतमात्री तू नको शोक करू कधी ।  30।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवन्तानी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मरूपी चैतन्य सर्व देहामध्ये असते. ते विश्वामध्ये सारख्या प्रमाणात भरलेले असल्याने त्याने सर्व विश्व व्यापलेले आहे. देहाचा नाश झाला तरी त्याचा नाश कधीही होत नसल्याने ते अमर आहे. हे सर्व जग त्याच्या मर्जीने उत्पन्न होते आणि नाहीसे होते, त्यात देहांचाही समावेश होतो, म्हणून ते नाहीसे होणार ह्याबद्दल तू कधीच शोक करू नकोस.

आत्म्याचे सविस्तर विवरण करून झाल्यावर देह नष्ट झाले तरी त्याबद्दल शोक का करू नये हे भगवंतानी अर्जुनाला समजावून सांगितले.

माणसाने देहाच्या असण्या- नसण्याला महत्त्व देण्यापेक्षा आपले कर्तव्य ओळखून ते पार पडण्याला  महत्त्व द्यायला हवे. अर्जुन क्षत्रिय होता म्हणून दुर्जनांना शिक्षा करून सज्जनांना अभय देणे हे त्याचे कर्तव्य होते. ते करायची संधी आलेली असताना ती सोडून तो लढाईतून पळ काढण्याच्या विचारात होता. त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी पुढील श्लोकातून भगवंत त्याला त्याच्या कर्तव्याची म्हणजे स्वधर्माची आठवण करून दिली. ते म्हणाले,

स्वधर्म तो हि पाहूनि न योग्य डगणे तुज ।

धर्म-युद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले । 31 ।

कर्तव्याला गीतेत भगवंत स्वधर्म असे म्हणतात. मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचे कर्तव्य हा त्याचा स्वधर्म असतो. म्हणून भगवंत त्याला सांगतात की, स्वधर्माचा म्हणजे कर्तव्याचा विचार केला, तर या युद्धापासून तू परावृत्त होणे योग्य नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.