आत्मा हा निर्विकार असून त्याला जन्म-मृत्यू नसतो
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, देहासकट समोर दिसणाऱ्या सर्व वस्तुत ईश्वरी अस्तित्व गुप्तरूपाने वास करत असते. हे मूळ ब्रह्माचा अंश असते. ब्रह्म हे शाश्वत व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे. ते केव्हाही नष्ट होत नाही.
न जन्म पावे न कदापि मृत्यु । होऊनी मागे न पुढे न होय? आला न गेला स्थिर हा पुराण । मारोत देहास परी मरे ना ।। 20 ।।
हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार आत्मा अनादि असून त्याला जन्म मृत्यू नसतो. तसेच तो ज्या शरीरात असतो ते नाश पावले तरी हा मरत नाही. तो कोणाला मारत नाही किंवा कोणाकडून मारला जात नाही. ह्याला जन्म मृत्यू नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुन: नाश होणारा आहे, असेही नाही. शरीराचा नाश झाला असता याचा नाश होत नाही. माणसांचे असणे नसणे ही केवळ माया आहे असे समज. मनुष्य व्यर्थ त्या भ्रमात पडतो.
पुढील श्लोकात वर सांगितलेल्या गोष्टीचा पुन्नरुच्चार करताना भगवंत म्हणतात, हे पार्था! या आत्म्याला जो नाशरहित, जन्मरहित, नित्य व क्षयरहित आहे असे जाणणारा तत्वज्ञानी पुरुष आत्मा मरणारा आहे किंवा मारणारा आहे असे कसे म्हणेल?
निर्विकार चि हा नित्य जन्म-मृत्यूहुनी पर । जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ।।21।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आत्मा हा निर्विकार असून त्याला जन्म-मृत्यू नसतो. म्हणून कुणी आत्मा जन्माला आला किंवा मरण पावला असे म्हणू लागला तर ते चुकीचे आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राने देहाच्या सावलीला मारल्यास शरीराला घाव लागत नाही किंवा पाण्याने भरलेला घडा पालथा केल्यावर त्यातील सूर्याचे प्रतिबिंब जरी नाहिसे झालेले दिसले तरी खरा सूर्य नाहिसा होत नाही किंवा, ज्याप्रमाणे आकाश हे माठामध्ये माठाच्या आकाराचे झालेले दिसते पण माठ फुटल्यावर आकाशाचा नाश होत नाही, त्याप्रमाणे शरीर नाश पावले, तरी मूळ आत्म्याचा कधीच नाश होत नाही.
आत्म्याने धारण केलेले शरीर जुने झाल्याने किंवा अपघाताने नष्ट झाले तर नाश न पावणाऱ्या आत्म्याचे पुढे काय होते हा प्रश्न साहजिकच मनामध्ये येतो. ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, ह्यात दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता अशी की, तो सध्याच्या शरीराशी एकरूप झालेला असल्याने त्याच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर तो बंधनात अडकतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनुकूल असलेल्या दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. दुसरी शक्यता अशी की, जर त्याच्या काहीही इच्छा शिल्लक उरलेल्या नसतील तर सध्याचा देह नष्ट झाल्यावर तो मुक्त होऊन त्याच्या मूळ स्वरुपात म्हणजे ब्रह्मतत्वात विलीन होतो. म्हणून माणसाने जसे आयुष्य वाट्याला आलेले असेल तसे स्वीकारून आत्म्याचा उद्धार करून घ्यावा म्हणजे त्याची जन्म-मृत्युच्या चक्रातून सुटका होते.
मनुष्याचे जीवन हे एक महास्वप्न आहे असे अर्जुनाला सांगून भगवंत पुढे म्हणाले, शरीरे अविनाशी आहेत अशी तुझी समजूत असल्याने समोरचे योद्धे तुझ्या हातून मरणार असे तुला वाटत आहे. मृगजळाने तहान भागेल म्हणून हरीण त्यापाठी धावत असते आणि व्यर्थ शिणून जीव गमावते तसे तू ह्या नातेवाईकांमध्ये जीव गुंतवलास तर तूच धोक्यात येशील. समोर दिसणारे आकार तात्पुरते आहेत आणि ते नष्ट झाले तरी त्यातील आत्मतत्व आहे तसेच राहणार आहे, हे लक्षात घे. म्हणजे शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ स्वरूपाचा नाश होत नाही हे तुला पटेल.
क्रमश: