त्रिगुणातून मुक्त झाल्याने त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसत असते
अध्याय सहावा
भगवंत म्हणाले, माणसाने आपले सध्याचे जीवन हे एक स्वप्न आहे हे लक्षात घेतले पाहिजे मग स्वप्नातील गोष्टी खऱ्या असतील का ह्यावर त्याने विचार करायला हवा. संतांनी कितीही जीव तोडून सांगितले तरी मी म्हणजे हा देह ह्या कल्पनेला मनुष्य घट्ट पकडून बसलेला असल्याने तो आपण देहापेक्षा वेगळे आहोत हे न मानता देहाभिमान वाढवत नेतो आणि आपला आपणच शत्रू होतो. आपण म्हणजे हा देह नव्हे हे ज्याच्या लक्षात आलेले असते. तो सद्गुरुंच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत करत आत्मज्ञानी होतो. त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात आलेली असतात आणि निरिच्छता ही त्याची ओळख बनलेली असते. सामान्य मनुष्याला परमेश्वराचा विसर पडलेला असल्याने देहाचा अभिमान वाटत असतो तर योगी सदैव ईश्वराच्या स्मरणात मग्न असल्याने त्याला त्याच्या देहाचा अभिमान वाटत नाही.
असा योगी कोणत्या मन:स्थितीत वावरत असतो ते भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, ज्याने आपले मन जिंकले आहे व जो अत्यंत शांत आहे, त्याचे ठिकाणी आत्मा हा आत्मभावाने रहातो. तो अनुभवाने परमात्मरूप बनतो. शीत अथवा उष्ण, सुख अथवा दु:ख, मान अथवा अपमान, अशा कोणत्याही परिस्थितीत तो शांत निश्चल असतो.
जितात्मा शांत जो झाला देखे ब्रम्ह चि एकले । मानापमानी शीतोष्णी सुख-दु:खी समावले ।। 7 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, आपण आत्मस्वरूप आहोत हे ओळखून ज्याने त्याचे अंत:करण जिंकले असते त्याच्या सर्व इच्छा नाहीशा झाल्यामुळे त्याला त्याच्यात दडलेला परमात्मा दिसू लागतो. ज्याप्रमाणे हिणकस सोन्यात मिसळलेल्या इतर धातूला बाजूला काढले की, शंभर नंबरी सोने उरते त्याप्रमाणे अहंकाराचा नायनाट झाला असता जीवातील ब्रह्मत्व उठून दिसते किंवा मातीचे भांडे फुटून घटाचा आकार नाहीसा झाला की, त्यातील पोकळीस आकाशात मिळण्याकरता कोठे लांब जावे लागत नाही, त्याप्रमाणे ज्याचा मिथ्या देहाहंकार नाहीसा झालेला असतो, तो मूळचाच सर्वत्र भरलेला परमात्मा होतो. तो देहापासून अलिप्त झाल्याने सुख, दु:खाची भावना किंवा मान, अपमान अशी समजूत ह्या गोष्टी त्याला मुळीच जाणवत नाहीत. सूर्य ज्या मार्गाने जातो तितका जगाचा भाग प्रकाशित होत जातो त्याप्रमाणे त्याला जे जे प्राप्त होईल, ते त्याचेच स्वरूप आहे हे उमजल्याने त्यातून वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या भावना होण्याचे कारणच उरत नाही किंवा असंही म्हणता येईल की, मेघापासून ज्या पावसाच्या धारा पडतात, त्या जशा समुद्राला खूपत नाहीत, त्याप्रमाणे शुभाशुभ कर्मे ही योगेश्वराच्या आत्मस्वरूपाहून भिन्न नसल्यामुळे, त्यास ती द्वंद्वे प्रतीतच होत नाहीत.
पुढील श्लोकात योग्याच्या मन:स्थितीबद्दल आणखीन सविस्तर सांगताना भगवंत म्हणाले, ज्ञान आणि विज्ञान यांच्या अनुभवाने ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांचे ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, अशा गुणी व्यक्तीला योगी म्हणतात.