आत्म्याला मनाने जाणता येत नाही
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना आत्म्याचे शरीर बदलणे हे अगदी स्वाभाविक आहे कारण हे शरीर विनाशी असल्याने कालांतराने ते थकते, वृद्ध होते, त्यामुळे काही करण्याच्या दृष्टीने हळूहळू कमकुवत होत जाते. म्हणून त्यातील आत्म्याला हे जगत चालवणारी शक्ती दुसरे शरीर प्रदान करते. हे म्हणजे एक वस्त्र बदलून दुसरे नेसल्यासारखेच आहे. शरीराबद्दल सांगून झाल्यावर आत्मा अविनाशी कसा आहे हे सांगताना भगवंत म्हणाले, आत्मा जन्म-मरणरहित असल्याने कायम टिकणारा असून अत्यंत शुद्ध आहे. ह्याला कसल्याही इच्छा आकांक्षा नसतात. हा प्रलयकाळच्या पाण्यानेही बुडत नाही किंवा अग्नीने जळत नाही. तसेच वायूमध्ये देखील याला कोरडे करण्याची शक्ती नाही. हा नित्य, स्थिर व शाश्वत असून स्वयंप्रकाशित परिपूर्ण आहे. त्याने सर्व देह व्यापलेला असतो. पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, आत्म्याबद्दल तर्कशास्त्राने काही अनुमान काढून त्याला जाणता येत नाही तसेच डोळ्यांनी ह्याला बघू म्हंटले तर तेही शक्य नाही. हा आत्मा मनाने जाणता येत नाही तसेच कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही.
न देखू ये न चिंतू ये ।
बोलिला निर्विकार हा ।
जाणूनि ह्यापरी आत्मा ।
शोक योग्य नसे तुज ।।25 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आत्मा डोळ्याने दिसत नाही. आपले मन तर या आत्म्यास भेटण्यासाठी उत्कंठित झालेले असते परंतु ह्याला मनाने जाणता येत नाही, कोणत्याही साधनाने हा प्राप्त होत नाही. हे पुरषोत्तमा, ह्याचा अंत लागत नाही. हा अनंत असून सत्व, रज, तम हे तिन्ही गुण त्यात नसतात. तो पूर्वापार चालत आलेला असून त्याला राग, लोभ, इच्छा, सुख, दु:ख इत्यादि विकार नसतात. तो दिसत नसला किंवा त्याचे चिंतन करता येत नसले तरी सर्वत्र समप्रमाणात असून सर्व शरीर व्यापणारा आहे. अर्जुना आता तुझ्या लक्षात येईल की, समोर दिसणारे तुझे आप्तस्वकीय जरी शरीराने नष्ट झाले तरी त्यांचे आत्मे अमर आहेत. ही गोष्ट तू मनावर बिंबवलीस की, तुझ्यामुळे हे मरण पावणार आहेत ह्या विचाराने तुला होणारे दु:ख आपोआप नाहीसे होईल. आत्मा अनादि अनंत आहे हे देवांनी सांगितलंच पण आपल्याला जन्ममृत्यूची जाणीव कायम असते हे लक्षात घेऊन पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, हे महाबाहो अर्जुना, आत्मा जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तू मानलेस तरीदेखील शोक करणे उचित नाही.
अथवा पाहसी तू हा ।
मरे जन्मे प्रतिक्षणी ।।
तरी तुज कुठे येथे ।
नसे शोकास कारण ।।26 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, अर्जुना आत्मा अविनाशी आहे, अमर आहे, हे जर तुला पटत नसले तरीदेखील तूला शोक करण्याचे कारण नाही कारण ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याचा ओघ अखंड असतो, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा क्रम अखंड चालू असतो. ज्याप्रमाणे उगमाच्या ठिकाणातून बाहेर पडलेल्या गंगेच्या पाण्याचे समुद्रापर्यंत जाणे कुणालाही थांबवता येत नाही. त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या प्राणिमात्राच्या ठिकाणी नेहमी होणाऱ्या घटना कुणीही थांबवू शकत नाही. म्हणून अर्जुना, तुला कुणाच्याही मृत्यूबद्दल शोक करण्याची गरज नाही कारण स्वभावत:च उत्पत्ती आणि लय असा सृष्टीचा क्रम फार पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि पुढेही तो असाच चालू राहणार आहे. हे जो लक्षात घेतो तो प्राप्त परिस्थितीत कधीही डगमगत नाही.
क्रमश: