दारूच्या नशेत पोटच्या गोळ्याने घेतला आईचा बळी
वारगाव येथील हृदयद्रावक घटनेने तालुका हादरला
कणकवली /वार्ताहर
आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना कणकवली तालुक्यातील वारगाव सोरफ-सुतारवाडी येथे घडली आहे. दारूच्या व्यसनापायी झालेल्या वादातून पोटच्या मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईचा निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास सुमारस ही घटना घडली. आरोपी रवींद्र रामचंद्र सोरफ (४५) याचे दारूच्या व्यसनामुळे आई प्रभावती रामचंद्र सोरफ यांच्यासोबत भांडण झाले. या वादातून संतापलेल्या रवींद्रने जवळ असलेल्या धारदार कोयत्याने आपल्या आईच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहूनही आरोपीला पश्चात्ताप झाला नाही. उलट, त्याने तिला तसेच ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. अवघ्या काही क्षणात घडलेल्या या प्रकारामुळे सोरफ कुटुंब पूर्णपणे हादरून गेले.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रवींद्रला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.या निर्घृण घटनेमुळे केवळ वारगावच नव्हे, तर संपूर्ण कणकवली तालुका हादरून गेला आहे. दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम किती भयावह असू शकतात, याचे हे एक विदारक उदाहरण यानिमित्ताने समोर आले आहे.