सर्वात छोटा शार्क मासा
पोटाचा भाग चमकणारा
शार्क हा शब्द ऐकताच मोठ्या सागरी जीवाचा विचार मनात येतो. परंतु एक अत्यंत छोट्या आकाराचा शार्क मासा असून त्याचे नाव ड्वार्फ लँटर्नशार्क आहे. सर्वात छोट्या आकाराचा शार्क असण्यासोबत याचे चमकणारे पोट अत्यंत कमालीचे असते. या माशामध्ये अनेक वैशिष्ट्यो असतात, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
ड्वार्फ लँटर्नशार्क एटमोप्टरिडे फॅमिलीतील एक अल्पज्ञात प्रजाती आहे. बहुधा जगातील सर्वात छोटा शार्क आहे. याची कमाल लांबी 20 सेंटीमीटर इतकी असते आणि हा फोटोफॉर्सद्वारे प्रकाश निर्माण करण्यास सक्षम आहे. ड्वार्फ लँटर्नशार्फ हा मच्छिमारांच्या जाळ्यात चुकून अडकला तरच नजरेस पडतो. याची लांबी 16-20 सेंटीमीटरपर्यंत असते. हा शार्क अत्यंत कमी आकाराचा असल्याने तो सहजपणे तळहातावर मावू शकतो. त्याचे शीर लांब अन् चपट्या आकाराचे असते. त्याचे डोळे बल्बसारखे असतात, जे अंधारात नेव्हिगेट करण्यास माशाला मदत करत असतात.
ड्वार्फ लँटर्नशार्क डार्क ब्राउन रंगाचा असतो, या शार्कमध्ये बायोल्यूमिनसेंट गुणधर्म असतात, जे त्यांना समुद्रात नेव्हिगेट करण्यास मदत करतात. हे शार्क अंधारात चमक निर्माण करत शिकारीला आकर्षित करतात आणि ते नजीक येताच त्यांना गिळकृंत करतात. हा शार्क स्वत:खाली पोहणाऱ्या शिकारींसाठी अदृश्य राहतो, कारण चमकणारे पोट त्याचा आकार लपवत असते.
या माशाच्या वरच्या जबड्यात 20 ते 23 दात तर खालच्या जबड्यात 30-34 दात असतात. याचे सरासरी आयुष्य 20-30 वर्षांचे असू शकते. याच्या शरीरावर 6 छोटे गिल स्लिट असतात, याचे शास्त्राrय नाव एटमोप्टेरस पेरी असून ते प्रसिद्ध शार्क तज्ञ पेरी गिल्बर्ट यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या माशाचा शोध 1964 मध्ये लागला होता.