मंगळवारी भारतीय शेअर बाजारात घसरणच कायम
सेन्सेक्स 492 अंकांनी तर निफ्टी 132 अंकांनी घसरणीत, कच्च्या तेलाच्या दरात वृद्धी, बँकिंग समभाग दबावात
शेअर बाजार मंगळवारी सलग सहाव्या दिवशीदेखील कोसळलेला दिसून आला. याचदरम्यान गुंतवणूकदारांचे 2.81 लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने बाजारावर याचा परिणाम थेटपणे दिसला. सेन्सेक्स 492 अंकांपर्यंत खाली आला. बँकिंग व आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीने बाजारावर दबाव निर्माण केला.
त. भा. वृत्तसंस्था/ मुंबई
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 492.70 अंकांच्या घसरणीसह 77,235.46 वर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी 132.75 अंकांनी घसरून 24,154.90 वर बंद झालेला दिसला. मंगळवारच्या सत्रात सरकारी बँका आणि आयटी कंपन्यांनी बाजारावर दबाव निर्माण केला होता. निफ्टी आयटी 2 टक्केनी कमकुवत होत बंद झाला. तर निफ्टी पीएसयू बँक 1 टक्केपेक्षा जास्त घसरलेला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे इराणशी सलोख्यावर ढग निर्माण झाले आणि कच्च्या तेलाच्या वाढीमुळे आशियाई बाजार भडकला. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही पहायला मिळाला. सुरुवातीपासूनच मंगळवारी शेअरबाजारात कमकुवतता दिसत होती. सलग सहाव्या दिवशी बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी मिडकॅप 100 जवळपास अर्ध्या टक्क्यांनी कमजोर झाला आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 सपाट स्तरावर बंद झाला.
निफ्टी ऑटोमध्ये किंचित वाढ झाली तर निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकही काहीसा कमकुवत होत बंद झाला. 17 ऑगस्ट 2026 रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व शेअर्सचे एकूण बाजार भांडवल मूल्य 4,93,54,909.78 कोटी रुपये होते. जे 18 ऑगस्ट 2026 रोजी 4,90,73,595.19 कोटींवर आले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या भांडवलात 281,314.60 कोटींची घट झाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढून बंद झाले. अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड, मॅक्स हेल्थकेअर आणि महिंद्राचे समभाग वधारले तर दुसरीकडे सर्वात मोठी घसरण रंग उत्पादक कंपनी एशियन पेंटस, ऑटो कंपनी टाटा मोटर्स पीव्ही तसेच आयटी क्षेत्रातील एचसीएलटेक आणि इन्फोसिसमध्ये झाली.
बीएसईवर 4530 शेअर्सचे व्यवहार झाले. यामध्ये 1930 शेअर्स मजबूत होते तर 2384 मात्र घसरले होते. याशिवाय 180 शेअर्स एका वर्षाच्या उच्चांकावर तर 91 शेअर्स एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले. होरायझन इंडस्ट्रियल पार्क व ललिता ज्वेलरी मार्ट यांच्या आयपीओचा मंगळवारी दुसरा दिवस होता. 19 ऑगस्टपर्यंत गुंतवणूकदारांना यात बोली लावता येणार आहे. ललिता ज्वेलरी कंपनी आयपीओअंतर्गत 1700 कोटी उभारणार असून दुसरीकडे होरायझन इंडस्ट्रियल पार्क मात्र 2600 कोटी रुपये उभारणार आहे.