अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीची चपराक
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे लोकप्रतिनिधी ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला चपराक लगावली आहे. भारताचीच नक्कल करताना पाकिस्तानेही जगभरात शिष्टमंडळे पाठविण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ अमेरिकेत गेले आहे. या शिष्टमंडळाने अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली. तुम्ही जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना नष्ट केल्या पाहिजेत, असे खहे बोल शेरमन यांनी सुनावले.
ही संघटना भारतात घडलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांची सूत्रधार आहे. त्यामुळे या संघटनेवर पाकिस्तानने कठोर कारवाई करुन तिची पाळेमुळे उखणून टाकली पाहिजेत, असे स्पष्ट आवाहन मी पाकिस्तानच्या शिष्टमंडळांला केले आहे, असे शेरमन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पाकिस्तानातील अन्य धर्मियांचे काय...
इतकेच नव्हे, तर पाकिस्तानमध्ये राहणारे हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदिया यांना त्यांच्या धर्मांप्रमाणे वागण्याची मुभा पाकिस्तानने दिली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानात अन्य धर्मियांवर आणि मुस्लीम धर्मातील सुन्नी सोडून अन्य पंथांच्या लोकांवर अन्याय केला जातो. त्यांना पक्षपाती वागणूक दिली जाते. योजनांच्या लाभांपासून त्यांना वंचित ठेवले जाते. हे मानवतेला धरुन नाही. पाकिस्तानने आपल्या देशातील अल्पसंख्याकांना समानतेची आणि न्यायाची वागणूक दिली तरच तो देश सन्मानाने उभा राहू शकेल, अशा अर्थाची सूचनाही शेरमन यांनी शिष्टमंडळाशी चर्चेच्या वेळी केली, अशी माहिती देण्यात आली.