आभाळ फाटलं
आभाळ फाटलं आणि कोसळलं तर दाद कुणाकडे मागायची अश्रू सुकतात पण दु:ख सरत नाही, अशी वेळ सोलापूर लातूर, बिडसह मराठवाड्यातील बहुतेक जिह्यांवर आली आहे. नद्यांना पूर आला आता माणुसकीचा गहिवर आणि मदतीचा महापूर अपेक्षित आहे, तो पण कमी अधिक येईल पण निसर्गाचे तांडव प्रतिवर्षी वाढते आहे, ते पाप कुणाचे त्यावर इलाज काय आणि त्यावर मात कशी करायची या प्रश्नांची उत्तरे शोधायची तर सगळेच दोष आपल्याकडे येतात. आपण आपले वर्तन सुधारले पाहिजे, आपल्या दृष्टीकोनात सुधारणा केली पाहिजे आणि बदलांचा, सुधारणांचा प्रारंभ स्वत:पासून सुरू केला पाहिजे. मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका मराठवाड्यातील जिह्यांना बसला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2,215 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रचलित निकषांमध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांना आठ-दहा दिवसात मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ढगफुटी सदृष्य पावसाने नुकसान किती झाले याची पाहणी करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री जणू अवघे सरकार पाण्यात उतरले आहे. प्रत्येक भागाचा आढावा, तेथील मदतकार्य, पूरात पावसात अडकलेल्या जनतेला मदत, सरकारी व सेवाभावी संस्था यांच्यात ताळमेळ, मदत संकलन, वितरण, वाटप, अशा सर्व पातळ्यांवर काम सुरु झाले आहे. या संकटात राजकारण नको, संकट परतवून लावूया, मदतीचा महापूर येऊ दे असे आवाहन मुख्यमंत्री देवाभाऊंनी केले आहे व ते आणि त्यांची टीम मैदानात उतरली आहे. मंत्री विविध जिह्यांचा दौरा करत आहेत. नकसानीचा, मदतीचा आढावा घेतला जातो आहे. त्याच जोडीला पूरग्रस्तांना सरकार तूमच्यासोबत आहे असा विश्वास दिला जातो आहे. विरोधी नेते आणि काही राजकीय पक्ष यांनी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली आहे पण ओला दुष्काळ अशी संकल्पना सरकारी कायद्यात नाही. अतिवृष्टीसाठी मदत अशी तरतूद आहे व त्यासाठी नियम, निकष आहेत, त्याप्रमाणे मदत करु, सरकार जनतेसोबत आहे असा विश्वास दिला गेला आहे व तोच महत्त्वाचा आहे. यंदा जूनमध्ये चांगला पाऊस होणार, असा अंदाज जाहीर झाला आणि बळीराजा आनंदला होता पण ही प्रचंड वृष्टी चांगली कशी म्हणायची, सोलापूर वगैरे भागांत गेल्या शतकातला सर्वात मोठा पाऊस कोसळत आहे. पाऊस कसला ढगफुटी असं सांगितलं जातं आहे. नदी, नाले, धरणं, शेती, घरं-दारं, जनावरं, संसार पाण्याखाली गेला आहे. सोयाबीन, उडीद, तूर, भुईमूग, मका, हळद यासह फळबागांना फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेणं आणि दु:खाचा डोंगर कोसळणं याची अनूभूती मराठवाडा घेतो आहे. गणपती विसर्जन झाले, पितृपंधरवडा संपला आणि नवरात्रीही सुरू झाली, तरी यंदा पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात अनेक जिह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतच, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबर रोजी कमी दाबाचा एक पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. हा पट्टा 28 सप्टेंबरपर्यंत राज्यात पोहोचू शकतो, ज्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढेल. या पट्ट्याच्या प्रभावामुळे 26 ते 28 सप्टेंबर या काळात राज्यात आभाळी हवामान आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यावर्षी तो कोसळतोच आहे, आता या चार दिवसांत त्याने आणखी तडाखा दिला तर यंदाचा खरीप पेरा पूर्ण वाया जाणार आहे. शेतकऱ्यांना लढ म्हणणं सोप आहे पण बदललेले हवामान आणि निसर्गाचा कोप वारंवार कायम राहिला तर लढायचे कसे, जगायचे कसे, असे अनेक संकटाचे डोंगर दिसू लागतात. पण सरकार आणि माणूसकीसोबत घेऊन यातून मार्ग काढावाच लागेल. ढगफुटी का होते. शेती व शहरं सातत्याने संकटात का येत आहेत, शास्त्रज्ञ आणि हवामान पंडित काय सांगत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि पर्यावरण रक्षणाचे शिवधनुष्य आपण प्रत्येकाने उचलले पाहिजे. आज जो तो पर्यावरण रक्षणाच्या बाता मारतो, तापमान वाढीचे नगारे पिटतो, झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा, प्लॅस्टिक निर्मूलन करा, माती, शेती, हवा, नदी, डोंगर, प्राणी, पक्षी यांना वाचवा असा टाहो फोडला जातो. तिजोरी रिकामी होते पण यातील काहीही साध्य होत नाही. ओघानेच शहरं तुंबत आहेत आणि नद्या आक्राळ विक्राळ रुप धारण करत आहेत. हे थांबलं पाहिजे. आपणच आपली वसुंधरा वाचवली पाहिजे व ती नव्या पिढीकडे सोपवली पाहिजे. विश्वपातळीवरचे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे आणि ते सर्वांना मिळून करावे लागेल. ओला दुष्काळ परवडला पण कोरडा नको असे म्हटले जाते. 1972 च्या दुष्काळानंतर अद्याप मोठा कोरडा दुष्काळ पडलेला नाही. निसर्ग जसा ओल्या दुष्काळाचा तडाखा देतो तसा तो कोरड्या दुष्काळाचा देऊ शकतो. सुदैवाने असा कोरडा दुष्काळ अलीकडे सर्वदूर पडलेला नाही, पाणी टंचाई, अवर्षणाची शिकार काही विभाग होतात पण तशी वेळ कधीच येऊ नये. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, आधी मदत द्या मग पंचनामे करा, अशी मागणी केली आहे तर शपगटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा व ते 80 हजार कोटी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरा, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी गुजरातला वारंवार आणि भरघोस मदत केंद्र देते तशी ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी केली आहे. शासन सकारात्मक दिसते आहे. संकटाचे राजकारण नको, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे पण समोर निवडणूका असताना राजकारण तर होणारंच पण आभाळ फाटले तेव्हा सर्व बाजूला ठेऊन माणसांनी माणसासारखे वागले पाहिजे व हातात हात घेऊन संकटावर मात केली पाहिजे.