पुरुषाचा नव्हे महिलेचा होता सांगाडा
200 वर्षांपासूनचा गैरसमज अखेर दूर
इंग्लंडच्या स्टोनहेंजनजीक 1801 साली एक अत्यंत खास थडगं शोधण्यात आले होते. या थडग्यात अनेक प्रकारची शस्त्रास्त्रs आणि सोन्याचे काम करणारी उपकरणे मिळाली होती. हाडांचा आकार पाहून हा एका पुरुषाचा सांगाडा मानला गेला होता, मागील 200 वर्षांपासून याला एक पुरुष शमन आणि जादूगार म्हटले जात राहिले. विल्टशायर म्युझियममध्ये देखील याला दाढीयुक्त पुरुषाच्या रुपात दाखविण्यात आले होते. आता लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटच्या नव्या डीएनए संशोधनाने सर्वांना चकित केले आहे. हा सांगाडा एखाद्या पुरुषाचा नव्हता, हा अर्ली ब्रॉन्झ एजमधील एका अत्यंत शक्तिशाली महिलेचा सांगाडा निघाला आहे. या खुलाशामुळे जुना इतिहास आणि महिलांच्या भूमिकेवरून सर्व मिथ्यकं तोडली गेली आहेत. ही महिला त्या काळातील एक उत्कृष्ट मेटलवर्कर आणि शमन होती. समाजात महिलांची प्रतिष्ठा किती अधिक होती हे या संशोधनातून समजते.
हे थडगं अप्टन लोवेल गावानजीक मिळाले होते. हे ठिकाण स्टोनहेंजपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. पुरातत्वतज्ञ विलियम कनिंग्टन यांनी याचा शोध लावला होता. हाडांचा आकार मोठा असल्याने त्यांनी याला एक शक्तिशाली पुरुष मानले होते. वैज्ञानिक याची डीएनए चाचणी करून त्याच्या पूर्वजांबद्दल माहिती मिळवू इच्छित होते, परंतु अहवाल प्राप्त झाल्यावर वैज्ञानिकांना धक्काच बसला.
सांगाड्यात एक्सवायऐवजी एक्सएक्स क्रोमोसोम मिळाले. हा स्पष्टपणे एका महिलेचा डीएनए होता. निष्कर्ष ठोस करण्यासाठी दात अन् पायाच्या अंगठ्याच्या डीएनएची पुन्हा चाचणी करण्यात आली, प्रत्येकवेळी निष्कर्ष एकच निघाला. थडग्यात अन्य कुणा इसमाचे अवशेष असल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नाही.
4 हजार वर्षे जुनी महिला
थडग्यात अनेक खास प्रकारची अवजार मिळाली होती. यात दगडी कुऱ्हाड आणि सोन्याचा थर असलेले मेटलवर्किंग टूल सामील होते. धातूंची शुद्धता मापणारा टचस्टोनही तेथे होता. याचबरोबर हाडांनी निर्मित दागिनेही होते. या सर्व गोष्टी ती महिला एक मोठी अध्यात्मिक गुरु होती असे संकेत देतात. ती सोन्याचे दागिने तयार करण्यात तरबेज होती, त्या काळात सोन्याला मनाजोगा आकार देणे एखाद्या जादूपेक्षा कमी मानले जात नव्हते. सोन्याला नवे रुप देण्याची कला त्या काळात जादुई मानली जात होती, ही कला त्यावेळी मोजक्या लोकांनाच अवगत होती असे तज्ञ सुसान ग्रेनी यांनी सांगितले आहे.
अनेक रहस्यांची उकल
सांगाड्याच्या तपासणीतून या रहस्यमयी महिलेविषयी अनेक गोष्टी समोर आल्या. या महिलेचा मृत्यू वयाच्या सुमारे 45 व्या वर्षी झाला होता. तिची उंची 5 फूट 4 इंच होती. ब्रॉन्झ युगातील महिलांच्या हिशेबानुसार ही उंची खूपच अधिक होती. महिलेचे शरीर अत्यंत मजबूत होते आणि ती अवघड काम करत होती. तिच्या डाव्या मनगटात एका आजाराच्या खुणा मिळाल्या. ती अनेक वर्षापर्यंत अवजड अवजारांनी मेटलवर्किंगचे काम करत राहिली होती. यामुळे हा आजार सातत्याने एकाच प्रकारचे काम करण्याचा परिणाम होता.
शक्तिशाली महिला
एखाद्या शक्तिशाली महिलेला चुकून पुरुष मानण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्वीडनमध्ये वायकिंग एजच्या एका योद्ध्याचे थडगे मिळाले होते. तेथील शस्त्रांना पाहून त्यालाही पुरुष मानले गेले होते. परंतु नंतर डीएनए चाचणीतून ती एक महिला सिद्ध झाली. स्पेनच्या कॉपर एजमधील एका थडग्यासोबत देखील असेच घडले होते. हा शोध आमच्या जुन्या धारणेला पूर्णपणे संपुष्टात आणतो. आतापर्यंत केवळ पुरुषच लीडर अन् मेटलवर्कर होते असे आम्ही मानत होतो, परंतु हा शोध महिला मेटलवर्कर असण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्या काळात मेटलवर्किंग आजच्या काळातील अंतराळशास्त्रासारखी मोठी गोष्ट होती असे विल्टशायर म्युझियमचे संचालक डेव्हिड डॉसन यांनी सांगितले आहे. आता आम्ही या थडग्याच्या कहाणीला नव्याने समजून घेत आहोत असे विल्टशायर म्युझियमच्या क्यूरेटर लिसा ब्राउन यांनी सांगितले. फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटमध्ये एका नव्या प्रदर्शनात ही सर्व माहिती जगासमोर मांडली जाणार आहे.
डीएनए तंत्रज्ञान
सध्याचे आधुनिक डीएनए तंत्रज्ञान जुन्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे काम करत आहे. पूर्वी आम्ही केवळ सांगाडे अन् सामग्री पाहून प्राचीन जगाविषयी अंदाज बांधू शकत होतो. परंतु आता विज्ञानाने प्राचीन काळात महिला देखील मोठ्या पदांवर होत्या हे सिद्ध केले आहे. महिला केवळ घरातील काम करत नव्हत्या, तर नेतृत्व अन् जादुई शमन देखील होत्या असे तज्ञांनी सांगितले आहे.