राजस्थानच्या हनुमानगढमध्ये स्थिती तणावपूर्ण
इथेनॉल प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध : हिंसेनंतर इंटरनेट सेवा बंद
वृत्तसंस्था/हनुमानगढ
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात गुरुवारचा दिवस देखील तणावपूर्ण राहिला आहे. निर्माणाधीन इथेनॉल प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन आमच्या मागण्या पूर्ण होइपर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकरी आणि विरोधी पक्षनेत्यांनी गुरुवारी दिला. आंदोलक गुरुवार सकाळपासूनच तिब्बीनजीकच्या गुरुद्वाऱ्यामध्ये जमू लागले. तर दुसरीकडे या भागातील इंटरनेट सेवा सलग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. तर प्रकल्पानजीक राहणाऱ्या सुमारे 30 परिवारांनी भीतीपोटी स्थलांतर केले.
राठीखेडा गावातील ड्यून
इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडच्या निर्मितीस्थळी बुधवारी शेकडो शेतकऱ्यांनी धाव घेतल्यावर हिंसा भडकली होती. या शेतकऱ्यांनी प्रकल्पाची भिंत तोडत कार्यालय तसेच वाहनांना पेटवून दिले होते. तर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हिंसक झटापट झाली. पोलिसांनी लाठीमार अन् अश्रूधूराचा वापर केल्याने आंदोलक आणखी संतप्त झाले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनालाही पेटवून दिले आहे. हिंसेत 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
काँग्रेस आमदार अभिमन्यू पूनिया हे देखील जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर स्थिती पाहता बुधवारी शाळा, महाविद्यालये आणि बाजारपेठ बंद राहिली. इथेनॉल प्रकल्पाला सर्व आवश्यक मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प 2022 मध्ये राइजिंग राजस्थान समिटदरम्यान घोषित झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरीही मिळाली असल्याचे हनुमानगढचे जिल्हाधिकारी डॉ. खुशाल यादव यांनी सांगितले आहे.
पर्यावरण मंजुरी अणि स्थानिक रहिवाशांची सहमती प्राप्त होत नाही तोवर प्रकल्प सुरू होऊ देणार नसल्याचे शेतकरी संघटनांचे सांगणे आहे. तर हनुमानगढ येथे धान्य आधारित इथेनॉल प्रकल्प निर्माण केला जात असून तो केंद्र सरकारच्या इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल कार्यक्रमाला चालना देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.