महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एका गाणाऱ्याचं जाणं

06:30 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मरावे परी कीर्तीरूपे उरावे अशी उक्ती तर सर्वश्रुत आहे. आणि असेही आपण म्हणतो की जाणारा माणूस हा स्वत:सोबत काहीही घेऊन जात नसतो. जे जे काही त्यानं कमावलेलं असतं ते इथेच ठेवून जात असतो. जेव्हा एखादा संगीत क्षेत्रातला माणूस निघून जातो तेव्हा त्याने ठेवलेलं संचित हे अपरंपार असतं. संगीत या विषयाची आवड हा एखाद्या राष्ट्राचा राष्ट्रधर्मही असू शकतो. हंगेरीसारख्या सुदूर देशात त्या देशाची लोकसंख्या एक कोटी असताना एक लाखापेक्षा जास्त लोक पद्धतशीरपणे तिथे गाणं शिकणारे होते आणि आजही हे प्रमाण कमी झालेलं नाही. अंगाईपासून सुरू होऊन ते रुदालीपर्यंत जाऊन पोहोचणारा असा गाण्याचा प्रवास जो आहे त्याच्याविषयी आपण कितीही विचार केला तरी आपलं कुतूहल शमतच नाही इतकी मोठी व्याप्ती, इतका मोठा आवाका संगीत या विषयाचा आहे.

Advertisement

‘जातस्यही ध्रुवो मृत्यू’ या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं जाणं हे त्याच्या येण्याच्या वेळीच निश्चित झालेलं असतं. परंतु येणे आणि जाणे याच्या दरम्यानच्या काळात त्याने जे आयुष्य जगलेलं असतं आणि ज्या आठवणी, जी कौशल्यं आणि जी माणसं गोळा केलेली असतात त्या सगळ्यापैकी नक्की काय जातं, काय राहतं यावरच त्या माणसाची लोकांना किती आठवण यावी, त्याच्यासाठी किती जणांना वाईट वाटावं हे ठरत असतं. इतर कोणत्याही भौतिक गोष्टींपेक्षा एक गाणं हे समाजाला खूप काही देत असतं. त्यामुळे ज्या वेळेला एखादा गाणारा माणूस, एखादा कलाकार माणूस हे जग सोडून जातो तेव्हा आपल्या पाठी तो सुरांचं, संगीताचं, त्याच्या अभ्यासाचं, खूप मोठं संचित ठेवून जात असतो.

Advertisement

एक छोटंसं गाव, ते गाव आणि त्याच्या आसपासचा परिसर संगीताने उजळून टाकणाऱ्या चार कलाकारांची आठवण काढण्यासाठी त्यांचं स्मृतिश्राद्ध करण्यासाठी तिथे आपुलकीने जमलेली साधीसुधी माणसं! आणि त्या कलाकारांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेले अभ्यासू कलाकार यामुळे त्या कार्यक्रमाचं वातावरण हे एखाद्या घरगुती कार्यक्रमाचं होतं. आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या आप्तांची जशी आठवण काढावी तशाच त्या माणसांच्या आठवणी काढल्या जात होत्या. मनातलं तळाशी जपून ठेवलेलं गुपित उघडावं त्याप्रमाणे आपल्या मनातल्या गोष्टी माणसं बोलत होती. आणि बोलता बोलता आतून गदगदून येत होती, गहिवरत होती.

अशा कार्यक्रमात ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला कळतं की एका गाणाऱ्याचं जाणं हे किती जणांसाठी कसं कसं वेदनादायक असतं ते. गावाखेड्याच्या मातीत विशेषत: कोकणच्या मातीत सूर मुद्दाम पेरावाच लागत नाही. दर पावसाळ्यात फुलणारा सुंदर फुलांसारखा सूरही या मातीतच वस्तीला असतो. फक्त थोडंसं मार्गदर्शन मिळालं की असे कितीतरी सच्चे सूर अजून वर येतात. फोफावतात. मोठे होतात. कोकणानं देशाला कितीतरी कलाकार दिलेले आहेत.

आज ते जगन्मान्य आहेत. मी ज्यांच्या विषयी ऐकलं ती माणसं अशीच होती. गावातल्या झाडीशेतीला जगवणाऱ्या पावसासारखीच ती गावाखेड्यातल्या सुरांना जगवण्याचं काम करीत होती. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ हाच मुळी त्यांचा जगण्याचा मंत्र होता. मग गावात कीर्तनकारांना साथीला साथीदाराची कमी पडो, नाटकांना मार्गदर्शन करण्यासाठी दिग्दर्शकाची गरज भासो, किंवा मनापासून आस्थवाईकपणे संगीत शिकू पाहणाऱ्या एखाद्या शिष्याला गुरुची गरज लागो, किंवा पुढे जाणाऱ्या कलाकाराला मदतीचा हात हवा असो या सर्व गोष्टी अशी माणसं आयुष्यभर करत आली. गाण्यासाठी स्वत:ला वाहून घेणे यापेक्षा वेगळं काय असतं? बरं सामान्यशा गावात राहत होती म्हणून ही माणसं काही सामान्य वकुबाची होती असं अजिबात नव्हे. सर्वजण एकाहून एक सरस वरचढ कलाकार होते. जिथे जातील तिथे तिथे अपार आदर आणि कौतुकास ते पात्र ठरलेले होते. कुणी नामवंत घराण्याचं शिक्षण घेतलेले होते तर कोणी एकलव्यासारखे साधना केलेले होते, पण ज्याला गाणं म्हणतात त्याचं मर्म काय असतं हे त्या सर्वांना उमगलेलं होतं. आणि ज्ञान जेंव्हा पचून रक्तात विरघळलेलं असतं त्यावेळेला त्याची नेटकी मांडणी करायला सायास करावे लागत नाहीत. पण का कुणास ठाऊक हे कलाकार लोक नियतीने बाह्य जगापासून लांबच ठेवले होते. कदाचित तिथल्या गावातल्या माणसांचं नशीब उजळण्यासाठी असेल.

कदाचित एकांतात संगीतसाधना उत्तम प्रकारे होते म्हणूनही असेल. कदाचित तेच त्यांचं नशीबही असेल. कोणी सांगावं? पण ती तिथे स्वस्थ बसली नाहीत. हातचा तानपुरा, तबला त्यांनी कधी सोडला नाही. आणि ज्ञान देण्याचं व्रत कधी टाकलं नाही. छोट्या छोट्या गावातून सुरांचे हजारो दीप त्यांनी आजपर्यंत उजळले असतील. गानगंगेच्या प्रवाहात स्वत:च्या कितीतरी ओंजळींचं योगदान त्यांनी दिलेलं असेल. नाहीतरी झाडाची फळे फुलं सगळ्यांना दिसतात. मुळं कुठे दिसतात? पण अशा न दिसणाऱ्या मुळांवरच तर झाड उभं असतं. म्हणून त्या माणसांचं जाणं हे चटका लावणारं आहे.

कोणाही कलाकाराच्या मृत्यूची बातमी ऐकली की मला नेहमी प्रश्न पडतो की एका गाणाऱ्याचं जाणं हे नक्की आपल्या सोबत काय काय घेऊन जातं. आणि पाठी काय काय उरतं? जर का त्याचं सगळं काही तो आपल्या सोबत घेऊन जात असतो तर मग सगळं काही इथेच ठेवून जावं लागतं या वाक्याचा अर्थ काय? आणि जर का तो पाठी इतकं मोठं संचित ठेवून जात असेल, तर मग सर्व लोकांचे जीव त्याच्यासाठी इतके व्याकुळ का बरं व्हावेत? आणि मग विचार केला आणि उमगायला लागलं एका गाणाऱ्याचं जाणं हे अनेकांसाठी अनेक प्रकारच्या पोकळी निर्माण करून जात असतं. कारण तो अनेकांच्या सांगीतिक साथीची सावली असतो.

अनेकांच्या मनात दडलेले सूर बाहेर काढणारा मार्गदर्शक असतो. गाण्याने ज्या ज्या लोकांना जखम दिली आहे अशा अनेक जखमी माणसांचा तो फार जवळचा सच्चा मित्र असतो. त्याच्या सुरावर भाळलेल्या किती वेड्या गोपिकांचा तो लाडका कृष्ण असतो. आणि जिच्या अंगणात त्याच्या पारिजातकाचा सडा पडत असतो त्या त्याच्या रुक्मिणीचाही तो प्रिय सखा असतो. याशिवाय सर्वसामान्य माणूस म्हणून तर त्याचं अबाधित स्थान घरीदारी सर्वत्र असतंच. आणि इतक्या सगळ्या पोकळ्या कधीही भरून न येण्यासाठी एकाएकी इतर सर्व माणसांसारखाच गाणारा माणूसही पाठी वळून न बघता निघून जातो. एका गाणाऱ्याचं जाणं हे असं असतं. त्याचं गणित कितीही विचार केला तरी शेवटपर्यंत सुटत नसतं हेच खरं.

अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article