For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योगाभ्यासाच्या स्थानाचे महात्म्य असे असते की, तेथे नास्तिकसुद्धा आस्तिक होतो

06:42 AM May 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
योगाभ्यासाच्या स्थानाचे महात्म्य असे असते की  तेथे नास्तिकसुद्धा आस्तिक होतो
Advertisement

अध्याय सहावा

Advertisement

भगवंतांनी योगाभ्यास कसा करावा ह्याबद्दल सविस्तर सांगण्यास सुरवात केली. योगाभ्यासासाठी आसन कसे असावे ह्याबाबत सांगताना ते म्हणाले, शुद्धस्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही, अशी जमीन निवडून त्यावर दर्भ घालून त्यावर जीन म्हणजे हरणाचे कातडे घालावे, त्यावर वस्त्र ठेवलेले असावे.

ह्या अर्थाचा पवित्र स्थान पाहूनि घालावे स्थिर आसन । दर्भ चर्म वरी वस्त्र न घ्यावे उंच नीच ते ।। 11 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. त्यानुसार, योगाभ्यासाला सुरवात करण्याआधी योग्य असे ठिकाण असणे जरुर आहे. सर्वप्रथम अशा ठिकाणी समाधान वाटले पाहिजे. माणसाला जेथे समाधान वाटते तेथून त्याला उठावे असे वाटत नाही. अशा ठिकाणी आहे ह्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे वाटू लागून वैराग्यास दुप्पट जोर येतो. ह्या ठिकाणी जर संतांनी वास्तव्य केले असेल तर त्या स्थानाचे पावित्र्य वाढून समाधानाला साहाय्य मिळून मनाला अधिक उल्हास वाटतो. त्यामुळे साधकाचा अभ्यास आपोआपच होऊ लागतो कारण त्याला अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करावे न लागता अभ्यास स्वत:च त्याला साधकाकडून करवून घेतो व अनुभव आपण होऊन साधकाच्या अंत:करणाला माळ घालतो. येथे साधकाचे मन आपणहून रमत असल्याने त्या स्थळाचे रम्यपणाचे माहात्म्य निरंतर असते. अर्जुना, अशा स्थानाचे महत्त्व इतके असते की, नास्तिक मनुष्य ह्या स्थानावरून सहज जरी गेला तरी त्याला तेथेच थांबून तपश्चर्या करावी अशी त्याला मनापासून आस्था वाटते.

Advertisement

अशा ठिकाणी विषयांच्या ओढीत रमलेला विषयासक्त मनुष्य अचानक आला तर तोही तेथून परत जाण्याचे नाव काढत नाही. याप्रमाणे असे स्थान न राहणाऱ्याला रहावयास लावते व भटकणाऱ्याला एके ठिकाणी बसवते आणि वैराग्याला थापटी मारून जागे करते. हे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटते की, या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे व येथेच स्वस्थपणे रहावे. हे स्थान सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असल्याने येथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. हे स्थान अतिशय पवित्र असल्याने येथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते. ह्या स्थानी पूर्वी संत राहिलेले असावेत परंतु तेथे लोकांचा राबता नसावा. येथे अमृताच्या योग्यतेची मुळासकट गोडी असलेली व नेहेमी फळणारी अशी दाट झाडे असावीत. ह्या ठिकाणी पावलोपावली पावसाळ्यातही निर्मळ असणारे पाणी असावे. येथे पाण्याचे झरे सहजी आढळावेत. झाडीमुळे येथील ऊन देखील सौम्य असावे आणि येथील वारा अतिशय शांत असून त्याच्या मंद झुळुका येत असाव्यात. असे स्थान बहुतेक नि:शब्द असावे. येथे राघू आणि भ्रमर नसावेत. ह्या ठिकाणी पाण्याच्या संबंधाने असणारे हंस, दोन चार चक्रवाक, क्वचित कधी कोकिळही असला तरी चालेल. येथे नेहमी जरी नसले तरी येऊन जाऊन असणारे काही मोरही असावेत. अर्जुना असे स्थान जरुर शोधून ठेवावे. त्या ठिकाणी सहज दृष्टीस न पडणारा एखादा मठ अथवा शंकराचे देऊळ असावे. यापैकी जे मनाला आवडेल अशा ठिकाणी एकांतात बसावे. आपले मन तेथे स्थिर रहाते की नाही ते पहावे आणि रहात असेल तर तेथे आसन लावावे. सध्या असे स्थान मिळणे मुश्किल असले तरी पूर्वीच्या काळी ऋषीमुनी कोणत्या ठिकाणी तपश्चर्या करत असावेत ह्याची कल्पना येते.

Advertisement

.