सगुण रूपाचे दर्शन आल्हाददायक असते
अध्याय आठवा
बाप्पांनी दिलेल्या ज्ञानचक्षुमुळे वरेण्य राजा बाप्पांचे विश्वरूप बघू लागला. भगवंतांनी गीतेच्या नवव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्व भुते त्यांच्यातच सामावलेली आहेत या गोष्टीचा तो प्रत्यय घेऊ लागला. सुरवातीला ते सर्व पाहून तो आश्चर्यचकित झाला पण एकूणच त्या विश्वरूपाचे रौद्र रूप पाहून हळूहळू विश्वरूपाच्या दर्शनाची त्याला भीती वाटू लागली. अर्थात आत्तापर्यंत आपण त्या विश्वरूपाचे जे वर्णन वाचलं त्यावरून लक्षात येतं की, ते भयानकच असलं पाहिजे. एखाद्या धरणामुळे निर्माण झालेला विस्तीर्ण जलाशय सुरवातीला नयनमनोहर वाटतो पण हळूहळू त्यातली भव्यता लक्षात येऊ लागली की, मग त्या पाण्याची भीती वाटू लागते किंवा एखादा धबधबा आधी आपलं मन आकर्षून घेतो पण मग त्यातली भव्यता सतत बघत राहिलं की, हळूहळू आकर्षणाची जागा भीतीने घेतलेली असते. एखाद्या ठिकाणी आग लागलेली असते. ती पहायला मनुष्य उत्सुकतेनं जातो पण तेथील आगीचे रौद्र रूप, लवलवत्या ज्वाळा बघितल्या की, धडकी भरते. वरेण्य राजाचं तसंच झालं आणि त्याला बाप्पांच्या विश्वरूपाची भीती वाटू लागली. विश्वरूप होतंच तसं महाभयंकर! त्या विश्वरूपामध्ये प्रलयकाळचा अग्नी कोठकोठे पेटलेला दिसत होता. भूत, प्रेत, पिशाच्चादि अक्राळविक्राळ जटाधारी जीव दिसत होते. उंच देहधारी राक्षसादि योनीतील जीव दिसत होते. ते सर्व पाहून आपण नेहमी पाहतो ते बाप्पांचं सौम्य, प्रेमळ रूप कुठं आणि हे अति व्यापक, अक्राळविक्राळ रौद्र रूप कुठं अशा विचाराने राजा भ्रमात पडला आणि एकूणच त्याला त्या सर्वांची भीती वाटू लागली. विश्वरूपाचं अतिविस्तीर्ण, अक्राळविक्राळ स्वरूप त्याला सहन झालं नाही. त्या घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेतच तो पुढील श्लोकात बाप्पांना त्यांचं सौम्य असं सगुण रूप दाखवण्याची विनंती करू लागला.
दर्शयस्व निजं रूपं सौम्यं यत्पूर्वमीक्षितम् ।
को वेद लीलास्ते भूमन् क्रियमाणा
निजेच्छया ।।21 ।।
अनुग्रहान्मया दृष्टमैश्वरं रूपमीदृशम् ।
ज्ञानचक्षुर्यतो दत्तं प्रसन्नेन त्वया मम ।। 22 ।।
अर्थ- जे पूर्वी पहात होतो ते आपले सौम्य रूप दाखवा. हे विभो अथवा बहुरूपधारी, स्वत:च्या इच्छेनुसार तू करत असलेल्या तुझ्या लीला कोण जाणू शकेल? तू प्रसन्न होऊन मला ज्ञानचक्षु दिलेस म्हणून तुझ्या अनुग्रहाने मी हे ईश्वरी रूप पाहिले.
विवरण-विश्वरूपाची भव्यता ना वरेण्याला सहन झाली, ना अर्जुनाला म्हणून दोघांनीही सौम्य, सुंदर सगुण रूप दाखवायची विनंती केली. इथं आपल्याला वेद आणि उपनिषदं तसंच संत महात्म्यांचं महत्त्व लक्षात येतं कारण त्यांच्यामुळेच आपल्याला ईश्वराच्या निर्गुण, निराकार आणि सगुण साकार रुपाची माहिती होते. त्याबाबत सांगताना श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, वेद आणि उपनिषदांनी आपल्याला ईश्वर या संकल्पनेचा आराखडा काढून दिला आणि संतांनी त्याबरहुकूम त्यात रंग भरून त्याचं सगुण रूप आपल्यापुढं ठेवलं. हे संतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. एक माणूस दुसऱ्या माणसावर जितकं प्रेम करू शकतो तितकं तो इतर प्राण्यावर करू शकत नाही. म्हणून माणसाला प्रेम करायला सोपं जावं म्हणून संतांनी निर्गुण निराकार असलेला देव माणसाच्याच रुपात साकारला. दिसायला आपल्या सारखेच असलेले देवाचे सगुण रूप सर्वांना आवडते, ते सर्वांना आनंददायक व दिलासादायक असतं. स्वत:च्या अनुभूतीवर आधारित, विश्वरूपाचं ज्ञानेश्वरीत सविस्तर वर्णन करूनसुद्धा, माऊली सगुण रूपाचं वर्णन त्यांच्या अभंगातून करताना म्हणतात, रूप पाहता लोचनी । सुख झाले वो साजणी ।।1 ।। तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।2 ।। बहुत सुकृतांची जोडी । म्हणून विठ्ठले आवडी ।।3।। सर्व सुखांचे आगर । बाप रखुमादेवी वर ।।4।।
क्रमश: