मुख्यमंत्री निवडीचा दे धक्का
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकत सत्ता स्थापन केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची 19 फेब्रुवारीला सर्वानुमते निवड करण्यात आली आणि 20 फेब्रुवारी रोजी त्या मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध झाल्या आहेत. देशभरामध्ये त्यांच्या निवडीची चर्चा केली जात आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना अनेक गोष्टींचा साकल्याने विचार केला गेला आहे. या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये परवेश वर्मा यासारख्या दिग्गज नेत्याचे नाव घेतले जात होते. त्यांच्यासह इतर नेत्यांची नावेही चर्चेत होती. मुख्यमंत्रीपदाबाबत 19 तारखेपर्यंत सस्पेन्स होता, तो त्यादिवशी संध्याकाळी संपुष्टात आला. रेखा गुप्ता यांचे नाव पुढे आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
शालीमार बाग या मतदारसंघामधून यंदा त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा त्यांनी 29595 मतांनी पराभव केला आहे. यापूर्वी 2015 आणि 2020 या विधानसभा निवडणुकीतही रेखा गुप्ता यांनी आपले नशीब आजमावले होते. 2015 व 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून रेखा गुप्तांना पराभूत व्हावे लागले होते. रेखा गुप्ता यांची झालेली निवड ही सर्वांना आश्चर्यचकीत करून गेली.
खरे तर या पदासाठी लोकसभेचे दोनवेळचे माजी खासदार परवेश वर्मा (माजी मुख्यमंत्री साहेबसिंग वर्मा यांचे पुत्र) हेच वजनदार नेते मानले जात होते. परंतु निवडीच्या अखेरच्या क्षणी रेखा गुप्ता यांची निवड केली. एकाअर्थाने त्यांच्या निवडीने सारेच सरप्राइज झाले. त्यांच्या निवडीची कारणेही आता समोर येऊ लागली आहेत. महिला सशक्तीकरण आणि वैश्य समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा उद्देश पक्षनेतृत्वाचा होता, असेही समजून आले आहे.
याआधी मुख्यमंत्रीपदासाठी पंजाबी, जाट आणि ब्राह्मण समुदायाला मुख्यमंत्रीपदाचा मान देण्यात आला होता. यामध्ये रेखा गुप्ता या पूर्णपणे फिट बसत असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने तळागाळातील नेत्यांना संधी देण्यासाठीच रेखा गुप्ता यांना निवडले आहे. याकरिता रा.स्व. संघाने भाजपकडे पाठपुरावा केल्याचेही बोलले जात आहे. रेखा गुप्ता यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आणि नेतृत्व कौशल्य असल्याने त्या पदाला न्याय देतील, असा विश्वास भाजप वरिष्ठांना आहे.
हरियाणातील जिंदमध्ये जन्मलेल्या रेखा या सुरुवातीपासून पक्षाच्या युवासंघासोबत जोडल्या गेल्या आहेत. लहानपणापासूनच त्या सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत राहिल्या आहेत. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यामध्ये त्या कार्यरत होत्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेतही त्यांनी योगदान दिले आहे. 1994-95 साली दौलत राम कॉलेजच्या सेक्रेटरी म्हणून निवडल्या होत्या. त्यानंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या 1995-1996 साली सेक्रेटरी आणि 1996-1997 मध्ये अध्यक्ष झाल्या. 2003-2004 साली खऱ्या अर्थाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर्षी दिल्ली युवा मोर्चा भाजपच्या त्या सचिव होत्या. त्यानंतर 2004-2006 सालामध्ये युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव बनल्या. 2007-2009 मध्ये महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्षपदीही त्यांना राहण्याचा मान मिळाला होता. मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या बनल्या. वर्तमान स्थितीत पाहता त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आहेत. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर गुप्ता यांच्या निवडीबद्दल मत मांडताना, कॅम्पस राजकारण अनुभव, राज्यातील संघटनेत योगदान, पालिकेतील प्रशासनाचा अनुभव आणि आता आमदार झाल्याने तळागाळातून वर आलेल्या रेखा यांना योग्य संधी मिळाली आहे, त्यांचे अभिनंदन, अशा प्रकारची पोष्ट केली होती.
आमदार झालेल्या रेखा गुप्ता या 5.31 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. तर दुसरीकडे त्यांच्यावर 1.20 कोटी रुपयांचे कर्जही आहे. वर्षाच्या कमाईमध्ये कमी जास्तपणा दिसून येतो. 2023-24 आर्थिक वर्षात 6.92 लाख रुपये, 2022-23 मध्ये 4.87 लाख रुपये आणि 2021-22 मध्ये 6.51 लाख रुपये इतकी त्यांची कमाई होती. त्यांचे पती मनीष गुप्ता यांची कमाई 2023-24 मध्ये 97.33 लाख रुपये इतकी होती. पती मनीष गुप्ता यांचा स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे.
रेखा गुप्ता या हरियाणातून आलेल्या तिसऱ्या मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. अंबालातील सुषमा स्वराज या 1998 मध्ये मुख्यमंत्रीपदी राहिल्या होत्या. तर भिवानी जिल्ह्यातील अरविंद केजरीवाल 2013 मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री होते. रेखा गुप्ता या देशातील दुसऱ्या आणि सध्याच्या भाजपशासित राज्यांचा विचार करता पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. सुषमा स्वराज, शिला दीक्षित आणि आतिशी यानंतर दिल्लीचे तख्मत सांभाळणाऱ्या रेखा गुप्ता या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. यमुना स्वच्छतेसह निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.
-दीपक कश्यप