For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शक्तीपीठ महामार्ग रद्दबाबत निर्णय न झाल्यास 12 जुलैनंतर महामार्ग रोको! शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा

07:32 PM Jun 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
शक्तीपीठ महामार्ग रद्दबाबत निर्णय न झाल्यास 12 जुलैनंतर महामार्ग रोको  शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा
Advertisement

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

कोल्हापूर

राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे या जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. या महामार्गाला राज्यातून विरोध होत आहे. शासनाने विधानसभा अधिवेशनापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा 12 जुलैनंतर मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्यासह पुणे-बेंगलोर रोखण्याचा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मंगळवारी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील,माजी खासदार राजू शेटी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत नेत्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला.

Advertisement

आमदार सतेज पाटील म्हणाले, 28 फेब्रुवारी रोजी भूलंपादनाचे पहिले नोटीफिकेशन आले. त्यानंतर 12 मार्च रोजी या महामार्गाच्या विरोधात पहिला मोर्चा काढला. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यामुळे या लढयाला बळ मिळाले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांवर नांगर फिरवणार आहे. शक्तीपीठ फक्त ठेकेदारांच्या हितासाठी आहे. निवडणूक रोखे घेतलेल्यासाठी हा मार्ग आहे. या विरोधात रस्त्यावरील लढाईसह कायदेशीर लढा देण्याची गरज आहे. प्रशासनाने याबाबतच्या जाहिराती प्रसिध्द केल्या. पण त्या जाहिराती लोकांपर्यंत पोहोचू नयेत अशा पद्धतीने प्रसिद्ध केल्या जात आहेत. कुठल्याही परिस्थितीत जमीनीची मोजणी होवू न देणे व चेक न घेण्याची शपथ घेण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. शासनाने या महामार्गाच्या बाबतीत सांगलीत दोन गट पाडण्याचे प्रयत्न केले, त्याप्रमाणे कोल्हापूरात होऊ नये याची दक्षता घ्यावी. महामार्ग रद्द करणार असेल तरच सरकार बरोबर चर्चेला जावू असेही ते म्हणाले. तसेच शुक्रवारपर्यंत मोठ्या संख्येने हरकती दाखल करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रातून याविरोधात उठाव होत आहे. सरकारला 12 जुलैपर्यत मुदत देत आहे. त्यानंतर महामार्ग रोखण्यासह सरकारला झेपणार नाही असे आंदोलन करण्याचा इशारा दिला. नोटीस देऊन शेतकऱ्यावर दडपण आणणार असाल तर जशास तसे उत्तर देऊ असेही पाटील म्हणाले.

श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. आहे ते रस्ते मोठे करावेत. शक्तीपीठ महामार्ग ठेकेदाराच्या भल्याचा आहे. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करुन शकतीपीठ महामार्ग रद्द करावा.

Advertisement

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गोरगरिबांची थडगी बांधून त्यावर विकासाचे मनोरे बांधू नका. शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नव्हती. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे होऊन ठराविक लोकांचे उखळ पांढरे होणार आहे. भक्तांचा बळी देवून हा मार्ग होणार असेल तर तो होवू देणार नाही. जमिनीच्या बदल्यात अत्यल्प मोबदला मिळणार आहे. या महामार्गामुळे पुराचीही भीती आहे असे शेटी म्हणाले.

माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, समृद्धी महामागाप्रमाणे शक्तीपिठ महामार्गातून काहीतरी मिळेल अशी काहींना अपेक्षा आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होवू देणार नाही. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात जाणार असून शेतकरी देशोधडीला लागणार आहे. यावेळी डॉ.भारत पाटणकर, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम,महादेव धनवडे, एप.पी.पाटील, विक्रांत पाटील, प्रसाद खोबरे, प्रकाश पाटील,के.डी.पाटील,शिवाजी कांबळे,प्रिया बाणदार, पूजा मोरे, मच्छिंद्र मुगडे,आनंदा पाटील, योगेश कुळमोवडे, सुधाकर पाटील, तानाजी भोसले, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, प्रशांत आंबी, आकाश भास्कर उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वीकारले निवेदन
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याबरोबर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याबाबत चर्चा केली. शक्तीपीठाला समांतर रस्ते असताना या महामार्गाची गरज काय असा प्रश्न केला. श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील,माजी खासदार राजू शेटी यांच्यासह शेतकऱ्यांनी हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी मागणी केली.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारले.

स्मार्ट प्रिपेड विरोधात आंदोलन करावे लागणार
आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तीपीठ महामार्गाबरोबर स्मार्ट प्रिपेड मीटरविरोधात आंदोलन करावे लागणार आहे. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारुन लूट होणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे सांगितले आहे. परंतु,याबाबत लेखी काही नसल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले.

जनतेत प्रक्षोभ असताना नोटीसा कशा दिल्या?
शिष्टमंडळातील नेत्यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीसीबाबत विचारणा केली.आज मोर्चा आहे म्हटल्यावर दोन दिवसापूर्वी नोटीसा आल्या आहेत.शक्तीपीठ महामार्गाविरोधात जनतेमध्ये प्रक्षोभ असताना तलाठ्याकडून नोटीसा कशा दिल्या जातात,तलाठी ऐकत नाहीत का? प्रशासनाला रेटायचेच आहे का असा प्रश्नांचा भडिमार केला.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नोटीसीबाबत माहिती घेण्याचे आश्वासन दिले.

Advertisement
Tags :

.