शक्तिपीठ ठरतोय राजकीय मैत्री-दुष्मनीचा राजमार्ग
कोल्हापूर / संतोष पाटील :
गोव्यापासून नागपूरपर्यंतच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या राज्यातील 12 जिह्यांतून जाणाऱ्या शक्तिपीठ मार्गाचा वाद आता कोल्हापूरच्या वेशीवर आला आहे. याचे विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचा याराना या वादातून अजून दृढ होण्याचे संकेत आहेत, तर समर्थक आमदार राजेश क्षीरसागर या निमित्ताने भाजप आघाडीची मोट बांधत आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राजकारणाचे संदर्भ देत, वाभाडे काढत रोष व्यक्त केला जात आहे. जिह्यातून शक्तिपीठ होईल किंवा नाही, हा प्रश्न अलाहिदा असला तरी यानिमित्ताने राजकीय मैत्री आणि दुश्मनीच्या रेषा मात्र गडद होत आहेत.
दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 802 किलोमीटर शक्तिपीठ महामार्गावरुन कोल्हापुरातील राजकीय वातावरण उन्हाळा वाढेल, तसे तापतच आहे. मंत्री मुश्रीफ. खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील शक्तिपीठाच्या विरोधात आहेत. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ व्हावे यासाठी उघडपणे व्यासपीठ निर्माण करत पाठींबा दिला आहे. राजकीय इर्षा-लांगेबांधे-स्पर्धा यांची किनार असलेल्या शक्तिपीठाच्या विरोधात आणि समर्थनामुळे जिह्याचे राजकारण तापत आहे.
शक्तिपीठाला विरोधासाठी बारा जिह्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्धार सतेज पाटील यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तिपीठाचा तोडगा काढला जाईल, असे स्पष्ट केले. तर मंत्री मुश्रीफ यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तिपीठाला विरोधच राहील, अशी भुमिका घेतली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना बाधित शेतकऱ्यांनी आमची जमीन घ्या, मात्र शक्तिपीठ मार्ग झालाच पाहिजे, असे निवेदन दिले.
दरम्यान, शक्तिपीठ मार्ग झाला पाहिजे, शहर आणि जिह्याची कनेक्टिव्हीटी वाढली पाहिजे, या विचारांचा मोठा वर्ग जिह्यात आहे. शक्तिपीठ मुद्याला राजकीय वळण लागल्याने हा विषय राजकीयदृष्ट्या आपणास पोळू नये यासाठी इतर नेत्यांची सावध भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठाच्या समर्थनासाठी व्यासपीठ निर्माण केले आहे. शक्तिपीठ विरोधात मैदानात उतरलेल्या मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर आमदार क्षीरसागर यांनी जोरदार वार केला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात मुश्रीफांनी विरोधी उमेदवाराला रसद दिली. सतेज पाटील यांनी पालकमंत्री, आणि महापालिकेचा कारभारी नेता म्हणून केलेल्या विकासाचा लेखाजोखा मांडावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. शक्तिपीठाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षातील राजकीय उणीदुणी आता काढली जाणार आहेत.
मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील संस्थात्मक राजकारणातील याराना सर्वश्रृत आहे. गोकुळ, जिल्हा बँक आणि महापालिकेच्या राजकारणात वर-वर विरोधाची भूमिका घेतली तरी हे दोन्ही नेते हातात हात घालूनच पडद्यामागे आणि उघडपणे काम करत असल्याचे अनेकवेळा कोल्हापूरकरांनी पाहिले आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, त्यानंतर गोकुळ आणि जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मुश्रीफ आणि सतेज पाटील हे अनेक जागांवर नुरा कुस्ती खेळतील, आपल्याला हवा तो उमेदवार निवडून आणणे आणि नको असलेल्याला ते घरी बसवतील. पडद्यामागे या दोन नेत्यांची होणारी संभाव्य युती निकालाचे पारडे फिरवू शकते. त्यामुळेच आमदार क्षीसागर यांनी शक्तिपीठ महामार्गावरुन या दोन्ही नेत्यांवर निशाना साधला आहे. येत्या राजकरणात भाजपची साथ क्षीरसागर यांच्या बाजूने उभी राहण्याची तरतूद केली जात आहे. मात्र, याचे प्रतिध्वनी आगामी राजकारणावर पडणार आहेत.
- मंत्री आबिटकर - प्रा. मंडलिकांची सावध भूमिका
शक्तिपीठावरुन जिह्यातील नेत्यांची दोन गटात विभागणी होत आहे. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांची सावध भूमिका आहे. पक्षांतर्गत राजकारणात आमदार क्षीरसागर यांचे राजकीय महत्व वाढणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तर शक्तिपीठावरुन मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न कागल आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असेल. सतेज पाटील यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत खास करुन राधानगरी मतदारसंघातील आक्रमक भूमिकेवरुन पालकमंत्री आबिटकर आणि प्रा. संजय मंडलिक हे सतेज पाटील यांना घेरण्यासाठी योग्य संधीची वाट पहात आहेत. शक्तिपीठाला समर्थन किंवा विरोध केला तरी याचा आपल्या राजकीय कारकिर्दीसह मागील राजकीय उट्टे काढण्यासाठी कितपत उपयोग पडेल, याचा अंदाज घेतला जात आहे. त्यामुळे वर-वर शक्तिपीठ हा एक महामार्ग असून त्याला नेहमीप्रमाणे विरोध होत आहे, असे वातावरण असले तरी त्याचे राजकीय तरंग खूप खोलवर आहेत.
- सर्वसमावेशक तोडग्याची गरज
शक्तिपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सहा पदरी असणारा हा महामार्ग वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 12 जिह्यांतून जाणार आहे हा 802 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणारा आहे. सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात, मात्र शक्तिपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे. शक्तिपीठामुळे राज्याच्या अनेक भागाशी कोल्हापूर जोडले जाणार आहे. शक्तिपीठाला विरोध किंवा समर्थन हे राजकीय अंगाने न घेता यातून सर्वसमावेशक तोडगा काढण्याची गरज आहे.