बिम्समध्ये बाळंतिणांच्या मृत्यूची मालिका सुरूच
बेळगाव :
सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात बाळंतिणींच्या मृत्यूचे प्रकार सुरूच आहेत. शुक्रवारी आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाला असून तिला वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
गेल्या आठवड्यातच एका बाळंतिणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच करडीगुद्दी येथील गंगव्वा गोडकुंद्री (वय 31) या बाळंतिणीचा शुक्रवार दि. 31 जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेची पोलिसात नोंद झाली नाही. गंगव्वा प्रसूतीसाठी 28 जानेवारीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिचे सिझेरियन करण्यात आले होते. दोन दिवस तिची प्रकृती चांगली होती. शुक्रवारी प्रकृती खालावली. तिचा रक्तदाब कमी झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. रात्री तिचा मृत्यू झाला आहे. बिम्स प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गंगव्वाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिचा भाऊ शंकर याने केला आहे. तिचे बाळ सुखरूप आहे.
डीआयईमुळे मृत्यू
गंगव्वाला 28 जानेवारी रोजी प्रस्तुती विभागात दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने तिच्यावर शुक्रवारी सायंकाळी सिजेरियन करण्यात आले. मात्र, चार तासानंतर तिचा मृत्यू झाला. रक्त तपासणी करण्यात आली असता डीआयईमुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन झाले आहे. डीआयई म्हणजे शरीरात रक्त चलनवलन प्रक्रियेत झालेला अडथळा.
डॉ. इराण्णा पल्लेद, वैद्यकीय अधीक्षक बिम्स.