For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक तणावामुळे सेन्सेक्स कोसळला

06:36 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक तणावामुळे सेन्सेक्स कोसळला
Advertisement

सेन्सेक्स  1065 अंकांनी नुकसानीत : निफ्टीचीही पडझड

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील तणाव वाढत असल्याच्या कारणास्तव भारतीय बाजारात सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी यांचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये वाढत्या भू-राजकीय तणावाबाबत जागतिक बाजारपेठेतील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही झाला. मुख्य कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 83,207 अंकांवर किंचित घसरणीसह उघडला. मात्र अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 1065.71 अंकांनी घसरुन निर्देशांक 82,180.47 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 353 अंकांनी घसरून 25,232.50 वर बंद झाला.

Advertisement

नकारात्मक स्थितीचा रुपयालाही फटका

‘नकारात्मक वातावरणात भर घालत, रुपया देखील झपाट्याने कमकुवत झाला आणि डॉलरच्या तुलनेत 91 च्या प्रमुख पातळीच्या खाली गेला, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर आणखी दबाव आला,’ असल्याचेही शेअर बाजार असभ्यासकांनी म्हटले आहे.

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, एटरनलचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक घसरले. बजाज फायनान्स 3.88 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, सन फार्मा, इंडिगो, ट्रेंट लिमिटेड, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स प्रमुख घसरणीचे होते. दुसरीकडे, फक्त एचडीएफसी बँकेचे शेअर्स तेजीसह बंद झाले आहेत.

जागतिक बाजारपेठांमधील वातावरण

मंगळवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरण सुरूच राहिली. जपानच्या निक्केई 225 आणि दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. जपानच्या शेअर बाजारावरही दबाव होता. कारण पंतप्रधान साने ताकाची यांनी पुढील महिन्यात लवकर निवडणुका घेण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच वेळी, मार्टिन लूथर किंग ज्युनियर डेमुळे सोमवारी वॉल स्ट्रीट बंद राहिला.

Advertisement
Tags :

.