For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरिच्छ झालेल्या साधकाला सर्व ब्रह्मव्याप्त असल्याची अनुभूती येते

06:41 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
निरिच्छ झालेल्या साधकाला सर्व ब्रह्मव्याप्त असल्याची अनुभूती येते
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

योगी यज्ञाच्या माध्यमातून आत्मसुखाच्या इच्छेने दैवताची रात्रंदिवस उपासना करतात. निरनिराळ्या प्रकारच्या यज्ञांनी कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत. यज्ञाने पापाचा नाश होऊन मनातील सर्व प्रकारचे दोष घालविले जातात. सर्व अज्ञान जळून गेल्यामुळे ते मूळच्या शुद्ध स्वरूपात शिल्लक राहते. यज्ञ केल्याचे फळ म्हणून मिळालेल्या ज्ञानरूपी अमृताच्या सेवनाने त्याला परब्रम्हाची प्राप्ती होते. इंद्रियांमुळे होणाऱ्या मोहावर विजय मिळवण्यासाठी जे कोणताच यज्ञ करत नाहीत, त्याना ह्या लोकी सुख मिळत नाही, मग त्यांचा परलोक सुखदायक कसा होणार?

आपले निर्णायक मत देताना पुढे भगवंत म्हणाले, सर्व प्रकारच्या द्रव्यसाधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा “ज्ञानयज्ञ” हा श्रेष्ठ आहे कारण सर्व प्रकारची कर्मे शेवटी ज्ञानामध्येच समाप्त होत असतात.

Advertisement

द्रव्य-यज्ञादिकांहूनि ज्ञान-यज्ञ चि थोर तो । पावती सर्व कर्मे अंती ज्ञानात पूर्णता ।।33 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, हे अर्जुना, वेदात अनेक यज्ञ सांगितले आहेत. ते केल्यावर केवळ स्वर्गसुखाचे फळ प्राप्त होते परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज लोपते, त्याप्रमाणे ज्ञानयज्ञापुढे इतर सर्व यज्ञ फिके पडतात. कारण इतर यज्ञ करून स्वर्गाचे फळ मिळते तर ज्ञानयज्ञातून परमात्मसुखाची प्राप्ती होते. ज्ञानयज्ञ हा चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. तो बोधाची खाण आहे आणि आत्मज्ञानाची भूक लागलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे.

ज्ञानयज्ञ म्हणजे कुणासाठी काय करणे आवश्यक आहे हे विवेकाने ओळखून, ते निरपेक्षतेने करणे. दुसऱ्या अध्यायात भगवंतानी ह्याला समत्वबुद्धी असे म्हंटले असून ती थोर असल्याचा निर्वाळा दिला आहे आणि पुढे सांगितले आहे की, ह्याप्रमाणे वर्तन केल्यास जन्ममृत्यूच्या चक्रातून माणसाची सुटका होते. माउली ज्ञानयज्ञाचे म्हणजेच कर्मयोगाचे महत्त्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी पुढे असे सांगतात की, जो ज्ञानयज्ञ करत असतो त्याच्या मनात समोरच्याचे कल्याण व्हावे एव्हढा एकच हेतू असल्याने त्याचे मन स्वच्छ असते. ज्याचे मन स्वच्छ असते तो त्रिगुणांच्या पलीकडे गेल्याने त्याच्या स्वभावातील त्रिगुणांचे प्राबल्य संपून जाते. त्याच्या मनात कोणतेही तर्कवितर्क येत नाहीत. त्याने इंद्रियजय साधलेला असल्याने त्याची इंद्रिये त्याच्या अंकित होऊन त्याच्या मर्जीनुसार वागतात. त्याला हवे असेल तेव्हाच विषयांची माहिती देतात आणि त्याला नको असेल तर विषयसंग विसरून जातात. सामान्य माणसाच्या मनावर मात्र इंद्रिये राज्य करत असतात. त्याला विषयांची इच्छा झाली की, ती त्याला विषयोपभोग घेण्यासाठी प्रवृत्त करत असतात. मात्र कर्मयोगी साधकाला इंद्रिये स्वाधीन असल्यामुळे त्याच्या मनाचे मनपण संपून गेलेले असल्याने त्याला कसल्याही इच्छा होत नाहीत. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन सर्व ब्रम्हव्याप्त असल्याची अनुभूती येते. सर्वाभूती एक आत्मा हे लक्षात आल्याने दिसायला प्रत्येकजण जरी वेगवेगळा असला तरी सगळ्यांचे आत्मस्वरूप एकच आहे ह्याची नोंद घेतली जाऊन हा आपला तो परका असा भेद संपुष्टात येतो. सर्व विश्व ब्रह्मव्याप्त आहे आणि समोर दिसणारे जग हा ब्रह्मावर होणारा आभास आहे हे समजते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.