For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शरीर निरोगी राहण्यासाठी साधक योगासने करत असतो

06:27 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
शरीर निरोगी राहण्यासाठी  साधक योगासने करत असतो
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

बाप्पा म्हणाले, माणसाची सुख मिळवण्यासाठी सतत धडपड चालू असते. कायम टिकणाऱ्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणारा कायम सुखात राहू शकतो. हे लक्षात आल्यावर त्यादृष्टीने तो प्रयत्न करू लागतो. जो ईश्वरप्राप्तीच्या मागे लागला आहे त्याच्यातही षड्रिपु असतात पण तो त्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी त्यांचा वापर करतो. तो वासना ईश्वराकडे वळवतो. ईश्वराचा मोह धरतो. त्यातूनच त्याला ईश्वरप्राप्तीचा लोभ सुटतो. त्यात तो कुठं कमी पडू लागला की, त्याला स्वत:चाच राग येतो.

एखाद्या दिवशी साधना झाली नाही तर त्याला वाईट वाटतं. अशा पद्धतीने तो षड्रिपूंना स्वत:च्या हितासाठी वापरतो. म्हणून ते त्याला बाधत नाहीत. उलट त्यांना काबूत ठेऊन तो त्यांच्यावर विजय मिळवून राज्य करतो. त्याला कुणाचा राग येत नाही की, कुणाचा मत्सर वाटत नाही. त्याला सर्वजण सारखेच असतात.

Advertisement

हा आपला तो परका असं न वाटता त्याला सर्व ईश्वररूप दिसत असतात. काही साधक शरीराला नियंत्रित करण्यासाठी योगसाधना करत असतात. त्यांना मार्गदर्शन करताना बाप्पा म्हणतात.

आसनेषु समासीनस्त्यक्त्वे मान्विषयान्बहिऽ ।

संस्तभ्य भृकुटीमास्ते प्राणायामपरायणऽ ।।26 ।।

अर्थ-या शब्दस्पर्शादि विषयांना बाहेर टाकून योगासने योग्य प्रकारे करणारा प्राणायामतत्पर योगी भुवयांचा संकोच करून बसतो.

विवरण- योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन हे आपणास माहित आहेच. ते होण्यासाठी माणसाने बाह्य गोष्टीतून मन काढून घेऊन ते ईश्वराप्रती एकाग्र करण्याची अत्यंत आवश्यकता असते. ज्याप्रमाणे एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे बाह्य गोष्टींच्या आकर्षणातून होणारी विषयोपभोगांची इच्छा आणि ईश्वरप्राप्तीची इच्छा ह्या दोन गोष्टी एकाचवेळी साध्य होऊ शकत नाहीत. एकाचवेळी दोन्ही डगरीवर पाय ठेऊन मनुष्य चालू शकत नाही. हे ओळखून साधकाने षड्रिपुंना त्याच्या ताब्यात आणलेलं असतं. सहसा षड्रिपूंचा उपयोग माणूस स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्याआड येणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी वा ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यांचा हेवा करणे इत्यादी गोष्टींसाठी करत असतो. पण साधकाच्या बाबतीत ही शक्यता संभवत नाही कारण त्यानं ठरवलेलं त्याच्या जीवनातील उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याला इतर कुणाची गरज नसते हे लक्षात आल्याने इतर मंडळींचं अस्तित्व त्याच्यादृष्टीने गौण झालेलं असतं.

मग इच्छा, आकांक्षा, असूया, ईर्षा हेवेदावे या गोष्टी त्याच्या जीवनातून हद्दपार झालेल्या असल्याने त्याला इतरांना कह्यात आणण्यासाठी षड्रिपुंची गरज रहात नाही. मग त्या षड्रिपुंचा उपयोग तो स्वत:ची आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी करतो. सदैव सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करतो. त्यासाठी निरपेक्षतेनं मनापासून प्रयत्न करतो आणि ईश्वराला तरी हेच हवं असतं. ईश्वराशी मिलन होण्याच्या तो अगदी नजीक असतो. त्याच्या इच्छाआकांक्षा जरी संपल्या असल्या तरी त्याविषयीचे विचार कधीकधी त्याच्या मनात डोकावत असतात. त्या संपूर्ण नाहीशा व्हाव्यात म्हणून तो यम, नियमांचे पालन कसोशीने करत असतो. त्याचबरोबर ध्यानधारणेत व्यत्यय येऊ नये म्हणून योगासने करून करून शरीर निरोगी व सुदृढ राखतो.

योगासनाबरोबरच बाप्पा साधकाला प्राणायाम करायला सांगत आहेत. यामुळे मन स्थिर होते. ब्रह्मप्राप्तीसाठी शारीरिक प्रयत्न म्हणून बाप्पा प्राणायामाची शिफारस करतात. प्राणायामाने दोन्ही भुवयांच्यामध्ये नजर स्थिर होते.  पुढील श्लोकात बाप्पा प्राणायामाचे महत्त्व विशद करत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.