गाठोड्याचे रहस्य
जन्मोजन्मीच्या, नफ्यातोट्याच्या, ऋणानुबंधाच्या, दिल्याघेतल्याच्या अनेक गाठी माणसाच्या आयुष्याच्या पदराला बांधलेल्या असतात. काळाच्या ओघात माणूस त्या सोयीस्करपणे विसरून गेलेला असतो. परंतु नियतीला ते पक्के लक्षात असते. तिथूनच सुरू होतो तो उभा-आडवा जीवनाचा शुभ्रधवल तर कधी रंगीत प्रवास. कधी एखादी गाठ अकस्मात सुटून जाते. फिटले, फिटले असे म्हणत माणूस आनंदी होतो खरा! परंतु कर्माचा अव्याहत चालणारा प्रवास नव्या गाठी बांधतच असतो.
जेव्हा स्त्रियांचा पेहराव नऊवार, पाचवार साडी असा होता तेव्हा घरोघरच्या स्त्रिया आपल्या साडीच्या पदराला गाठी बांधत. कशासाठी? तर एखादी गोष्ट लक्षात राहावी म्हणून. कुटुंबात विलक्षण व्यस्त असणाऱ्या स्त्रिया घरसंसारातील किंवा मुलेबाळे, नातेवाईक यांच्या संबंधातील महत्त्वाची गोष्ट विसरली जाऊ नये म्हणून पदराला गाठी बांधत. स्त्रियांची आणि साडीच्या पदराची गाठ तर वारंवारच पडायची. साडीचा पदर फक्त मिरवण्यापुरता उरला आणि त्याबरोबर मराठी भाषेमधील अनेक संदर्भ लुप्त झाले. एकेकाळी आईच्या पदराखाली सारे घर उबदार सुरक्षित होते. निवांत होते. आईचा पदर तेवढा मोठा होता. आठवणीसाठी मारलेली गाठ काम होताच सुटायची परंतु गंमत अशी की उतारवयात पदराला गाठ कशासाठी मारली हेच एखाद्या माऊलीला आठवायचे नाही. मग अधिकच पंचाईत होत असे.
जन्मोजन्मीच्या, नफ्यातोट्याच्या, ऋणानुबंधाच्या, दिल्याघेतल्याच्या अनेक गाठी माणसाच्या आयुष्याच्या पदराला बांधलेल्या असतात. काळाच्या ओघात माणूस त्या सोयीस्करपणे विसरून गेलेला असतो. परंतु नियतीला ते पक्के लक्षात असते. तिथूनच सुरू होतो तो उभा-आडवा जीवनाचा शुभ्रधवल तर कधी रंगीत प्रवास. कधी एखादी गाठ अकस्मात सुटून जाते. फिटले, फिटले असे म्हणत माणूस आनंदी होतो खरा! परंतु कर्माचा अव्याहत चालणारा प्रवास नव्या गाठी बांधतच असतो.
श्रीमद् भागवतामध्ये सुदामा आख्यान आहे. गुरूगृही सहाध्यायी असलेला सुदामा श्रीकृष्णाचा मित्र होता. कृष्णाचे मित्रप्रेम सर्व जाणतात. मित्रांसाठी त्यांनी लोण्याची चोरी केली. आपल्या मित्रांना खाऊ घातल्यानंतरच तो लोणी खात असे. सुदामा याची पत्नी सुशील व गुणी होती. तरी तिचा सुदाम्याइतका अध्यात्माचा अभ्यास नव्हता. दारिद्र्यामुळे ती गांजून गेली होती. शिवाय आपल्या मुलांना उपाशी राहावे लागते हे दु:ख तिच्या सहनशक्तीपलीकडचे होते. द्वारकेचा राजा असलेला भक्तवत्सल श्रीकृष्ण आपल्या नवऱ्याचा मित्र आहे हे जाणून तिने आपल्या पतीला त्याच्याकडे पाठवले. तो काहीही कृष्णाजवळ मागणार नाही हे तिला पक्के ठाऊक होते. देवाला हजार डोळे आहेत. तो सारे समजून घेईल या विश्वासाने शेजारच्या चार घरातून तिने उसने दोन मुठी पोहे कृष्णाला द्यायला मागून आणले. एका फाटक्या चिंधीमध्ये गाठ मारून पक्के बांधले. त्याचे छोटेसे गाठोडे पतीच्या हातात देऊन तिने मोठ्या विश्वासाने त्याला श्रीकृष्णाकडे पाठवले. कृष्ण लक्ष्मीपती आणि साक्षात विश्व निर्माण करणारा परमात्मा. त्याने दोन मुठी पोहे असलेले छोटेसे गाठोडे सुदाम्याकडून हिसकावून घेतले.
सुदाम्याला काही देण्यासाठी त्याला त्याच्याकडून काही घ्यावे लागले. सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णाने पूर्ण संपवू नये म्हणून लक्ष्मी मातेने स्वत:साठी ते मागून घेतले. पू. डोंगरे महाराज म्हणतात, सुदाम्याच्या कपाळी ब्रह्माने कर्माचा हिशेब मांडला होता. त्यात श्री क्षय? अर्थात लक्ष्मीचा अभाव असे स्पष्ट लिहिले होते. कृष्णाने तो ब्रह्माचा लेख उलटवून दिला व लिहीले यक्ष श्री:अक्षय समृद्धी. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘हे सांगावे काय किरीटी, तुवाचि देखिले आपुलिया दिठी, मी सुदाम्याचिया सोडवी गाठी, पव्हयालागी.’ ‘अर्जुना, तू बघितले आहेस. सुदाम्याच्या खांद्यावर गाठ मारलेले छोटेसे गाठोडे होते. त्यात थोडेसेच पोहे होते. त्या पोह्यासाठी मी त्या गाठोड्याच्या गाठी भराभर सोडल्या’. प्रत्यक्ष परमात्म्याने ते पोहे खाल्ले आणि विश्वाचे पोट भरले. कृष्ण विश्वात्मा असल्याने साऱ्या विश्वाला अन्नदान करण्याचे पुण्य त्याने सुदाम्याकडून करवून घेतले.
जन्मोजन्मीच्या संचिताचे गाठोडे रिकामे कसे करायचे हे भगवंतांनी भगवद् गीतेच्या तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. भगवंत म्हणतात, मला सर्व कर्मे अर्पण करा. माणूस जी जी कर्मे करतो. त्याचे संचित तयार होते ना. माणसाला चांगल्या कर्माचे समाधानही असते आणि चुकीच्या कर्माची रुखरुख देखील. परंतु त्याहीपेक्षा कर्म करताना कर्तृत्वाच्या जाणिवेतून पोसलेला अहंकार मध्यवर्ती असतो. त्यातूनच फळाची अपेक्षा आणि आसक्ती निर्माण होते. कर्म समर्पण केले की कर्मबंधनातून सुटका होते. हे माझे नाही म्हटल्याने कर्माच्या गाठीसुद्धा सुटतात. संस्कार असा आहे की ‘झाले गेले गंगार्पण’ असे म्हणण्याची पद्धत आहे. तर पूजाकर्मानंतर ‘कृष्णार्पणमस्तु’ असे म्हणतात.
महर्षी विनोबा भावे त्यांच्या आईने लहानपणी सांगितलेली एक गमतीची गोष्ट सांगत. एका बाईचे आपले ठरलेले होते की जे काही होईल ते सर्व कर्म कृष्णार्पण करायचे. तेव्हा शेणाने सारवण करीत असत. ती जमिनीवरच्या उष्ट्याला शेण लावून तो शेणगोळा बाहेर फेकत असे व फेकताना कृष्णार्पणमस्तु म्हणत असे. तो शेणगोळा तिथून उठायचा आणि श्रीकृष्ण मंदिरातल्या मूर्तीच्या मुखावर जाऊन बसायचा. रोज असे काय होते हे पुजाऱ्याला कळेचना नंतर त्याला कळले की ही बाई जिवंत आहे तोपर्यंत रोज असेच घडणार. एक दिवस बाईचा अंतकाळ आला. तिने मरण देखील कृष्णार्पण केले. त्या क्षणी देवळातल्या मूर्तीचे तुकडे झाले. मूर्ती भंगली. तिला नेण्यासाठी स्वर्गातून विमान आले. ते विमानही तिने कृष्णार्पण केले. विमान मंदिरावर जाऊन आपटले आणि त्याचेही दोन तुकडे झाले. विनोबा असे म्हणतात, सारे जीवन म्हणजे महान यज्ञकर्म आहे. कोणतेही कर्म हे परमेश्वराचे आहे या भावनेने केले तर ते पवित्र होते.
दत्तावतारी संत नानामहाराज तराणेकर यांच्या भजनावलीत एक अप्रतिम भजन म्हणतात. ‘माझे माझेचे गाठोडे तुझ्या चरणाशी वाहिले, तुझे, तुझे म्हणताना किती मोकळी मी झाले’ गणगोत, संसार, चिंता, मोह, मुलेबाळे, वैभव यात गुंतलेली ‘मीपण’ असलेली गाठ एकदा सुटली की मग काय होते तर ‘माझे, माझे मीपण तुझ्या चरणी वाहिले, तुझे तुझे म्हणताना तुझ्यातच विलोपले.’ माझे माझेचे गाठोडे सद्गुरूंच्या चरणी वाहिले की सद्गुरूंच्या इच्छेत इच्छा मिसळून राहता येते आणि कर्मबंधनातून मुक्त होता येते. संतांनी उभे केलेले आध्यात्मिक कार्य ते ईश्वराला समर्पितच करतात. समर्थ रामदास स्वामी ग्रंथराज दासबोध लिहिल्यानंतर म्हणतात, ‘भक्ताचेनी साभिमाने कृपा केली दाशरथिने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध.’ या कर्मसमर्पणाला नुसता नमस्कार केला तरी पुरे.
पूर्वी प्रवासाला जाताना सामानाचे गाठोडेच असायचे. त्यात कपड्यांसह साऱ्या वस्तू सामावल्या असायच्या. गावाला गेले आणि गावाहून परत आले की साऱ्या वस्तूंचे वाटप होत असे. आयुष्य ही सुद्धा एक यात्रा आहे. आयुष्य संपले की कर्माचे गाठोडे नको नको म्हटले तरी बरोबर येणारच. ते त्या विधात्यासमोर मोकळे होणार आणि त्यातून पुन्हा एक नवा जन्म उभा राहणार. त्यापेक्षा माणसाने अंतर्यात्रा का करू नये? ही यात्रा करताना माणूस नि:संग असतो. कर्मरहीत असतो. त्यामुळे गाठोडे सुटून जाते. गाठींचा प्रश्नच उद्भवत नाही. पण नेमके हेच रहस्य मात्र लवकर समजून घेता येत नाही. एवढे मात्र नक्की!
-स्नेहा शिनखेडे