एका अस्थिपंजराचे रहस्य...
गतकाळात घडलेल्या घटना, त्यावेळचे मानवी जीवन इत्यादींविषयी मानवाला प्रचंड कुतूहल आहे. या जिज्ञासेपोटी जगभरात हजारो संशोधकांनी इतिहास शोधण्याच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे. अनेकांनी तर आपले सारे वर्तमानकालीन जीवनच इतिहास आणि पुरातनकाळ शोधण्यासाठी व्यतीत केलेले आहे. असे संशोधन करताना अनेकदा अनपेक्षित घटना घडतात, ज्यांच्यामुळे अनेक अपसमज दूर होतात किंवा नव्याने निर्माण होतात. इस्रायल देशात एका पुरातन कबरीचे खोदकाम करताना या कबरीत लोखंडी साखळ्यांनी जखडलेल्या मृत व्यक्तीचा अस्थिपंजर (हाडांचा सापळा) आढळून आला. त्याच्यावर संशोधन करण्यात आले. प्रथमत: तो एका पुरूषाचा असावा आणि या पुरुषाला साखळ्यांनी जखडून मारण्याची शिक्षा देण्यात आली असावी असे संशोधकांचे मत बनले.
तथापि, सखोल संशोधन केल्यानंतर हा अस्थिपंजर पुरुषाचा नसून एका महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संशोधक चक्रावून गेले. साखळ्यांनी जखडलेला महिलेचा अस्थिपंजर मिळण्याची ही प्रथमच वेळ होती. त्यामुळे तिला असा मृत्यू का आला असावा, याविषयी आणखी संशोधन करण्यात आले. हा अस्थिपंजर 1 हजार 500 वर्षांहून अधिक पूर्वीचा असावा, असे अनुमान आधीच करण्यात आले होते. दीड हजार वर्षांपूर्वी सध्याच्या इस्रायलच्या भूप्रदेशात पुरुषांमध्ये स्वत:ला साखळ्यांनी जखडून घेऊन प्राण सोडण्याची प्रथा होती. असे केल्याने मृत्यूनंतर चांगला पुनर्जन्म मिळतो, अशी श्रद्धा होती. त्यामुळे अनेक पुरुष आपला अंतकाळ नजीक आल्यानंतर अशा प्रकारे प्राणत्याग करीत होते.
त्यामुळेच प्रथम हा अस्थिपंजर एका पुरुषाचा असावा, अशी संशोधकांची समजूत झाली होती. पण तो महिलेचा आहे, हे दिसून आल्यानंतर त्या दिशेने संशोधन करण्यात आले. हे संशोधन केवळ त्या अस्थिपंजराचेच करण्यात आले, असे नाही. त्याकाळातील अनेक कागदपत्रांचाही नव्याने अभ्यास करण्यात आला. पुरुषांप्रमाणे महिलांमध्येही अंतकाळी साखळ्यांनी स्वत:ला जखडून घेण्याची परंपरा होती आ, याचा शोध घेण्यात आला. मात्र, तशी परंपार आढळून आली नाही. या महिलेने एक प्रकारची तपस्या करण्यासाठी अशा प्रकारे स्वत:ला जवळपास आयुष्यभर जखडून घेतले असल्याची माहिती समोर आली. असे करणाऱ्या महिलांना त्याकाळी मोठा आदर आणि सन्मान दिला जात असे, असेही अभ्यासात आढळून आले. अस्थिपंजराच्या दातांच्या अभ्यासावरुन तो महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले. या संशोधनामुळे गतकाळातील जीवनावर आणखी प्रकाश पडला आहे.