दुसरा टी-20 सामना पावसामुळे वाया
वृत्तसंस्था / डंबुला
यजमान लंका आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मुसळधार पावसामुळे वाया गेला. या मालिकेत पाकने गेल्या बुधवारी झ्ा़ालेल्या पहिल्या सामन्यात लंकेचा सहा गड्यांनी पराभव करत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी येथे खेळविला जाईल. दरम्यान उभय संघातील दुसऱ्या सामन्यात सातत्याने पावसाच्या धारा कोसळल्याने मैदानावर पाणी साचले. खेळपट्टी ओलसर झाल्याने पंचांनी खेळ सुरू न करण्याचा निर्णय घेतला. बराचवेळ वाट पाहून पंचांनी किमान दोनवेळा मैदान आणि खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर हा सामना रद्द झाल्याचे घोषित केले. भारतामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून उभय संघाची ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतून दोन्ही संघांना सरावाची संधी मिळत आहे. मात्र या स्पर्धेतील पाकचे सर्व सामने लंकेत खेळविले जातील. या मालिकेनंतर लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका लंकेत खेळविली जाणार आहे. चालु महिन्याच्या अखेरीस लंकन संघ इंग्लंडमध्ये मालिका खेळणार आहे. आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल.