शांतता चर्चेची दुसरी फेरीही फिसकटली
थेट चर्चेऐवजी ‘मध्यस्थां’वर भिस्त : इराणी शिष्टमंडळ पाकिस्तानातून माघारी
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद, तेहरान
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची दुसरी फेरीही फिसकटल्याचे शनिवारी सायंकाळी स्पष्ट झाले. इराणने थेट चर्चेऐवजी ‘मध्यस्थ’ म्हणून भूमिका निभावणाऱ्या पाकिस्तानसमोर आपल्या महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या असून आता इराणचे परराष्ट्रमंत्री अमेरिकी अधिकाऱ्यांची भेट न घेता पाकिस्तानमधून निघून गेले आहे. तूर्तासह दोन्ही देश अप्रत्यक्ष मार्गांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून सध्या चर्चेच्या या दुसऱ्या फेरीत पाकिस्तान प्रमुख मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.
अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव आणि अविश्वास अजूनही तीव्र आहे. याचदरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी इस्लामाबादला भेट देत पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची भेट घेतली. या बैठकीत द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक स्थिरता आणि राजनैतिक प्रयत्नांवर चर्चा झाली. पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत होते.
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पाकिस्तानात होऊ शकते असे मानले जात होते. या चर्चेसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री इस्लामाबादमध्ये दाखल झाले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी त्यांचे स्वागत केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या बैठकीसाठी आपले विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जावई जेरेड कुशनर यांना पाठवले होते. मात्र, इराणी शिष्टमंडळाने त्यांच्याशी थेट चर्चा केली नसल्याचे समजते. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी यावेळी पाकिस्तानला भेट दिलेली नाही.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची भेट घेतली. मात्र, इराणने एक वेगळेच निवेदन जारी करत ‘अशी कोणतीही बैठक नियोजित नव्हती.’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर इराण आपली भूमिका थेट अमेरिकेला न कळवता पाकिस्तानी अधिकाऱ्यांमार्फत कळवेल असे म्हटले आहे. याचा अर्थ जर चर्चा झालीच, तर ती समोरासमोर होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थ म्हणून काम करत असताना अमेरिका चर्चेबद्दल आग्रही होते. तर दुसरीकडे इराणने थेट चर्चा स्पष्टपणे नाकारली होती.
यापूर्वी पहिली फेरीही अयशस्वी
इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेची पहिली फेरी पाकिस्तानच्या मध्यस्थीने 11-12 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये पार पडली. 21 तास चालूनही ती अयशस्वी ठरली होती. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण आणि अणुकार्यक्रमावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकले नाही. तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी अमेरिकेला सामुद्रधुनीतून संपूर्ण आणि सुरक्षित जलवाहतूक हवी आहे. दुसरीकडे, इराणला या प्रदेशात आपला प्रभाव कायम ठेवायचा आहे आणि वाटाघाटींमध्ये दबाव आणण्यासाठी याचा वापर करायचा आहे. याव्यतिरिक्त अमेरिकेला इराणने आपला अणुकार्यक्रम मर्यादित ठेवावा असे वाटते.
युद्धविरामादरम्यान तेहरान विमानतळ पुन्हा सुरू
इराणने युद्धविरामादरम्यान तेहरानचे मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘इमाम खोमेनी’ पुन्हा सुरू केले आहे. तेहरान टाइम्सच्या वृत्तानुसार, इराणी एअरलाइनची विमाने शनिवारी इस्तंबूल आणि मस्कतसाठी रवाना झाली. हा निर्णय या प्रदेशातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. युद्धामुळे अनेक आठवड्यांपासून हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. सामान्य हवाई वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा हळूहळू पुन्हा सुरू केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी आता चर्चेची दुसरी फेरी फिसकटल्याने या वाहतुकीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.