शहराचा दुसऱ्या टप्प्यातील सेफसिटीचा प्रस्ताव सात वर्षे धुळखात
कोल्हापूर / दीपक जाधव :
शहरात काही वर्षांपूर्वी सेफ सिटीच्या पहिल्या टप्प्यात सात कोटींतून तब्बल 168 सीसीटीव्ही बसवले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात अजून 100 अद्ययावत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याच्या प्रस्तावास शासनाकडून गृहविभागाने ग्रीन सिग्नल दिला असून तांत्रिक तपासणीसाठी मात्र तो शासनाच्या आय. टी. विभागात सात वर्षांपासून धुळखात पडून आहे.
सद्य:स्थितीत पहिल्या टप्प्यातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही कधी बंद तर कधी चालू असे आहेत. त्यामुळे हे सीसीटीव्ही ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. सात वर्षांपासून सेफसिटी अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी 12 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. हा निधी मिळाल्यास संपूर्ण कोल्हापूर शहर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात येण्यास वेळ लागणार नाही.
सन 2018-19 ला सेफ सिटीचा दुसरा टप्प्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाच्या गृहविभागाने प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली. पण तांत्रिक तपासणीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाच्या आय. टी. विभागाकडे पाठवला आहे. त्याठिकाणी तो सात वर्षे धूळखात पडला आहे. या प्रस्तावात कोल्हापूर शहरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्याबरोबरच मोबाईल व्हिडिओ, सर्व्हिलन्स सिस्टीम, ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरे, भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम, व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टीम, ऑडिओ-व्हिडिओ संवाद सुविधा केंद्र, इमर्जन्सी व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, वाहतूक पोलिसांसाठी दुय्यम नियंत्रण कक्ष आणि कोल्हापूर महापालिका येथे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आदींचा समावेश आहे. परंतु हा प्रकल्प अद्याप शासनाकडे निधीसाठी प्रलंबित आहे.
सध्या शहरात सन 2015 मध्ये सेफ सिटीचा पहिला टप्पा अंतर्गत आजघडीला शहरात मुख्य चौकात आणि वर्दळीच्या ठिकाणी 168 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यात 116 स्थिर कॅमेरे, 180 अंशात फिरणारे 32 कॅमेरे तर 360 अंशात फिरणारे 17 कॅमेरे आहेत. त्यातील 152 चालू आहेत. या कॅमेऱ्याचे नियंत्रण हे कंट्रोल रूम पोलीस मुख्यालयात आहे. या ठीकाणी 24 तास अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. ते या तिसऱ्या डोळ्याद्वारे संपूर्ण शहरावर लक्ष ठेवत असतात. पण सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे जरा सोसाट्याचा वारा सुटला की हे कॅमेरे बंद पडतात.
- सद्यस्थितीत 16 कॅमेरे बंद
शहराचा तिसरा डोळा असणारे सीसीटीव्ही कॅमेरे सातत्याने बंद पडत असल्याने एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांना खाजगी आस्थापना, शोरूम, सोसायटीत, संकुल यांच्या सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागत आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तेथे पोलिसांच्या तपासावर मर्यादा येत आहेत. संपूर्ण राज्यातील शहरे सुरक्षेच्या दृष्टिने सीसीटीव्हीच्या कक्षेत आणली जात असताना निव्वळ निधीअभावी कोल्हापूर शहरात महत्त्वाच्या ठीकाणी सीसीटीव्ही नाहीत.
- ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेरा पोलिसांना फायद्याचा
ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकग्निशन कॅमेऱ्यामुळे शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांचीही नोंद या कॅमेऱ्यात होणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे ऑटोमेटिक क्रीनशॉट घेतल्याने गुह्यांशी संबंधित असलेली वाहने शोधण्यास पोलिसांना मदत होणार आहे. व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे आपत्कालीन व्यवस्थेसाठी असलेल्या वाहनांची सिस्टीम सुधारण्यात येणार आहे.