महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजकारणातील ‘शक्ती’ स्थळ

06:30 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची यात्रा संपविताना मुंबईत केलेल्या एका विधानावरुन सध्या प्रचंड गदारोळ उठला आहे. बरेच नेते नेहमीच काहीना काही वादग्रस्त बोलून गोंधळ निर्माण करत असतात. नेता फारसा महत्त्वाचा नसेल तर त्याच्या अशा विधानांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. कारण कोणत्याही मोठ्या निवडणुकीच्या प्रचारकाळात असे ‘जिव्हाप्रमाद’ जगात सर्वत्र घडतात. भारतातही ते होत असतील तर ते जगावेगळे नसते. पण जेव्हा एखादी मोठी परंपरा असलेल्या पक्षाचा सर्वोच्च नेता काही विधान करतो, तेव्हा त्याची नोंद घ्यावी लागते. कारण ते केवळ त्या नेत्याचे व्यक्तीगत विधान असत नाही. तर ते त्याच्या पक्षाचे धोरणही असू शकते. निदान तसे मानले जाते. या देशात एक ‘हिंदू शक्ती’ आहे. सर्व विरोधी पक्ष या शक्तीला विरोध करीत आहेत. राजाचा ‘प्राण’ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात आहे. अशा अर्थाचे विधान राहुल गांधी यांनी केल्याचे या प्रसंगाचा व्हिडीओ पाहिल्यास समजून येते. यातून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे कळू शकत नाही. अनेकदा त्यांनी अशी अनाकलनीय विधाने केली आहेत. त्यातीलच हे एक वाटते. कदाचित त्यांना या विधानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष लढत आहेत, असे सुचवायचे असावे. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर आपला विश्वास नाही, असेही सांगावयाचे असावे, असा अर्थ काही तज्ञ काढतात. पण त्यांनी त्यासाठी ‘वक्रोक्ती’चा आधार घेण्याची काय आवश्यकता होती? या वक्रोक्तीमुळे सर्व वाद निर्माण झाला आहे. ते सरळ आरोप करु शकले असते. सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष आणि राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष यांच्यात या निवडणुकीत किमान 200 मतदारसंघांमध्ये थेट संघर्ष होणार आहे, ही बाब प्रत्येकाला माहीतच आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राहुल गांधी स्पर्धा करु इच्छितात, हेही सर्वांना ठाऊक आहे. अशी उघड स्थिती असताना अप्रत्यक्ष किंवा वक्रोक्तीपूर्ण बोलून काही साध्य होण्याची शक्यता नसते. उलट शब्दप्रयोग विचारपूर्वक केला नाही, तर मोठाच वाद निर्माण होण्याची शक्यता असते. तसा तो गांधी यांच्या विधानामुळे निर्माण झाला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या हाती आयता मुद्दा लागल्याचेही दिसत आहे. ‘शक्ती’ हा शब्द हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृतीत देवतांना उद्देशून आणि त्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करण्यासाठी उपयोगात आणला जातो. दुर्गा, अंबा, काली आदी देवता या ‘शक्ती’ मानल्या जातात. तसेच नारी किंवा महिला यांचाही उल्लेख शक्ती असा केला जातो. नारीशक्ती, महिलाशक्ती असे शब्दप्रयोग रुढ आहेतच. दिवंगत पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ ‘शक्तीस्थळ’ म्हणून ओळखले जाते. तेव्हा कोणत्याही शब्दांचा अर्थ नीट लक्षात घेऊन त्यांचा उपयोग करावा लागतो.   गांधी यांनी नुसताच शक्ती असा शब्द उच्चारला असता तरी खपून गेले असते. पण त्यांनी शक्ती या शब्दाच्या आधी ‘हिंदू’ हा शब्द जोडला. तसे का केले? हिंदू हा शब्द नुसता कधी येत नाही. हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृती, हिंदू जीवनपद्धती, हिंदू तत्वज्ञान, हिंदू परंपरा, हिंदू आचारविचार, हिंदू अस्मिता असे अनेक अर्थ आणि अनेक भाव ‘हिंदू’ या शब्दात एकवटलेले असतात. या सर्व अर्थांची स्वतंत्ररित्या किंवा एकत्रित ‘शक्ती’ असतेच. या शक्तीशी विरोधी पक्ष कसे लढणार आहेत? कारण विरोधी पक्षांना कोणत्याही निवडणुकीत हिंदू समाजाच्या मतांची आवश्यकता असतेच ना? हिंदू समाजाला टाळून निवडणूक लढविली जाऊ शकेल असा अत्यल्प भूभाग या देशात आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असो, त्या पक्षाची विचारसरणी कोणतीही असो, त्याची ध्येये किंवा महत्वाकांक्षा कोणत्याही असोत, त्याला निवडणुकीचे राजकारण करावयाचे असेल तर हिंदू शक्तीचा आधार घेऊनच करावे लागते ही व्यवहारी वस्तुस्थिती आहे. अशावेळी ‘हिंदू शक्ती’च्या विरोधात विरोधी पक्ष संघर्ष करीत आहेत, अशी भाषा करणे हे मोठ्या असंतोषाला निमंत्रण देण्यासारखे आहे. अगोदरच ‘सनातन धर्मा’संबंधी अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय भाषा काँग्रेसच्या मित्रपक्षांपैकी एकाच्या काही नेत्यांनी केली आहेच. ‘सनातन’ धर्म याचा अर्थ हिंदू धर्म असाच घेतला जातो. अशा स्थितीत हिंदू शक्तीशी लढण्याची भाषा आगीत तेल ओतणारी ठरु शकते, याचे भान निदान उच्चस्तरीय नेत्यांनी तरी ठेवावयास नको काय? तसे न ठेवले गेल्यास, तो लोकसभा निवडणुकीसारख्या संवेदनशील काळात मोठा राजकीय मुद्दाही होऊ शकतो. काही वर्षांपूर्वी ‘मौत के सौदागर’ या शब्दांनी गुजरातमधील एक विधानसभा निवडणूक गाजवली होती, हा इतिहास आजही स्मरणात आहे. तसेच ‘नीच किस्म का आदमी’, आदी विधानांमुळे पाहता पाहता राजकीय वणवा पेटला होताच. भारतीय जनता पक्षासारख्या प्रचार यंत्रणा भक्कम असणाऱ्या पक्षाच्या हाती असा मुद्दा लागला तर तो सोडणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे जे शब्द एका मोठ्या समाजाच्या धर्माशी आणि संस्कृतीशी जोडले गेलेले असतात, त्यांचा दक्षतापूर्वक उपयोग करणे आवश्यक असते. अर्थात, राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानावर नंतर स्पष्टीकरण देऊन आपल्या विधानाचा धर्माशी काही संबंध नाही. विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असे प्रतिपादन केले आहे. तथापि, ‘बूंद से गयी, वो हौदसे नही आती’ अशी एक म्हण आहे. अर्थात, एकदा एखादे चुकीचे विधान केले गेले, की नंतर कितीही स्पष्टीकरण दिले तरी व्हायचा तो परिणाम झालेला असतोच. शेवटी हे राजकारण आहे. येथे कोणताही पक्ष आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाला सावरुन घेण्यासाठी बसलेला नाही. सध्याच्या राजकारणात स्पर्धा तीव्र आहे. सर्व पक्ष एकमेकांवर टपून बसलेले आहेत. गांधीच्या या विधानावर निवडणूक आयोगाकडेही धाव घेण्यात आली आहे. हे सर्व टाळता येणे शक्य होते. त्यामुळे यापुढे तरी विचारपूर्वक विधाने होतील अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article