दीड वर्षाच्या आंदोलनानंतर बसविण्यात आली शिल्पे
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना मिळाली जागा : शिवप्रेमी-भीमप्रेमींचा जल्लोष
बेळगाव : दीड वर्षाच्या आंदोलनानंतर अखेर बेळगाव रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्यात आले. अनेकवेळा आंदोलन केल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली. शिल्प बसविल्यानंतर शिवप्रेमी व भीमप्रेमींनी रेल्वेस्थानक परिसरात एकच जल्लोष केला.बेळगाव रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक इतर राष्ट्रपुरुष व बेळगावमधील ऐतिहासिक घटनांची शिल्पे लावण्यात आली. परंतु छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प बसविण्याकडे रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. 27 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वीही कर्नाटक दलित संघर्ष समिती भीमवाद व श्रीराम सेना हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.
त्यावेळी तीन महिन्यांत शिल्प बसविले जाईल, असे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतरही विविध दलित संघटना व शिवप्रेमींनी वारंवार निवेदन देऊन शिल्प बसविण्याची मागणी केली होती. तात्पुरत्या स्वरुपात रेल्वेस्थानकाच्या प्रवेश द्वारानजीक शिल्प ठेवण्यात आली होती. 14 ऑगस्ट 2024 ला पुन्हा एकदा आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी आपण महिन्याभरात शिल्प बसवू, असे आश्वासन नैर्त्रुत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारनंतर रिझर्व्हेशन काऊंटरवरील भिंतीवर शिल्प कायमस्वरुपी बसविण्यात आली. यामुळे भीमप्रेमी व शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला. मंगळवारी दुपारनंतर मुख्य प्रवेशद्वाराशेजारी शिल्प बसविण्यात येत असल्याने रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शिव व भीमप्रेमींनी मिठाई वाटप करून हा आनंद साजरा केला. यावेळी रेल्वेस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आंदोलनाला यश आल्याबद्दल आनंद
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातील राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असल्यामुळे रेल्वेस्थानकावर इतर राष्ट्रपुरुषांसोबतच त्यांचेही शिल्प असावे, यासाठी आमचे आंदोलन सुरू होते. दीड वर्षानंतर या आंदोलनाला यश आल्याने आनंद होत आहे.
-रवि बस्तवाडकर (अध्यक्ष दलित संघर्ष समिती)
बेळगावकरांचा लढा यशस्वी
शिवप्रेमी व भीमप्रेमींनी वारंवार केलेल्या आंदोलनामुळेच कायमस्वरुपी शिल्प बसविण्यात आली. दीड वर्षानंतर का होईना परंतु शिल्प बसविण्यात आल्याने आम्ही रेल्वे प्रशासन व अधिकाऱ्यांचे आभारी आहोत. बेळगावकरांनी पुन्हा एक लढा यशस्वी करून दाखविल्याबद्दल सर्वांचे आभार.
-रमाकांत कोंडुसकर (अध्यक्ष श्रीराम सेना हिंदुस्थान)