For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राक्षसी कर्जाचा विळखा; वेळीच ओळखा!

12:14 PM Jan 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
राक्षसी कर्जाचा विळखा  वेळीच ओळखा
Advertisement

आमिषाला नका पडू बळी : कर्जवसुलीच्या जाच बेततोय जीवावर : आत्महत्यांच्या संख्येत वाढ

Advertisement

बेळगाव : मायक्रो फायनान्स चालकांच्या जाचामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. बेळगावातही फायनान्सच्या विचित्र कर्जाच्या फेऱ्यात अडकून हुक्केरी तालुक्यातील एका महिलेने आपले जीवन संपविले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून रामनगर, रायचूरपाठोपाठ आता बेळगावातही फायनान्स चालकांचे उपद्रव वाढले आहेत. सरोजा बसवराज किरबी (वय 52) रा. शिरुर, ता. हुक्केरी असे त्या महिलेचे नाव आहे. सरोजा यमनापूरच्या ऊरुसासाठी आपल्या बहिणीच्या घरी आली होती. काकती हद्दीतील कल्लाप्पा सिदराय येतोजी यांच्या शेतवडीतील विहिरीत सरोजाचा मृतदेह आढळून आला आहे. तिचा मुलगा मारुती बसवराज किरबी याने दिलेल्या फिर्यादीवरून होळ्याप्पा फकिराप्पा दड्डी, मूळचा राहणार मुत्यानट्टी, सध्या रा. यमनापूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

होळ्याप्पा दड्डीवर गेल्या महिन्यात माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 7 हजार 707 जणांना होळ्याप्पा व त्याच्या कुटुंबीयांनी 19 कोटी 35 लाख 35 हजार 636 रुपयांना ठकवले आहे. होळ्याप्पाची पत्नी अश्विनी, मुलगी शेवंता, प्रियांका व होळ्याप्पा या चौघा जणांविरुद्ध माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच कर्जाच्या फेऱ्यात अडकून महिलेने आत्महत्या केली आहे.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार सरोजा किरबी या महिलेला होळ्याप्पा दड्डीने फायनान्समधून कर्ज काढून निम्मी रक्कम आम्हाला दिल्यास कर्जाची पूर्णपणे परतफेड करण्याची जबाबदारी आमची, अशी ग्वाही दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून सरोजाने 2 लाख 31 हजार रुपये कर्ज उचलले होते. त्याची निम्मी रक्कम एक वर्षापूर्वी होळ्याप्पाला देण्यात आली होती. त्यानंतर काही हप्ते सुरुवातीला त्याने भरले. नंतर त्याने हप्ते भरणे बंद केले. आपल्या नावाने काढलेल्या कर्जाची निम्मी रक्कम आपण होळ्याप्पाला दिली आहे. कर्ज तर आपल्या नावाने आहे. त्याची परतफेड कशी करायची? याची सरोजाला चिंता लागली होती. 22 जानेवारी रोजी त्या आपल्या बहिणीच्या घरी आल्या होत्या. त्याचवेळी या महिलेने विहिरीत उडी टाकून आपले जीवन संपविले आहे. सरोजाप्रमाणेच होळ्याप्पा व त्याच्या कुटुंबीयांनी 7 हजार 707 हून अधिक जणांची फसवणूक केली आहे. रामनगर, रायचूर, म्हैसूर परिसरात मायक्रो फायनान्सचा उपद्रव वाढला असून गेल्या पंधरवड्यात अनेकांनी आत्महत्या केली आहे. आता बेळगावातही त्याचे लोण पसरले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने दखल; उद्या बैठक

काकती व माळमारुती पोलीस स्थानकात फसवणूक प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंद झाले आहेत. खासकरून महिलांची फसवणूक करण्यात आली असून एकूण कर्जाच्या रकमेपैकी निम्मी रक्कम आम्हाला द्या, तुमच्या संपूर्ण कर्जाची परतफेड आम्हीच करतो, असा विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली होती. गेल्या पंधरवड्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही याप्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कृष्णा या आपल्या निवासस्थानी अधिकारी व संबंधित मंत्र्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे. मायक्रो फायनान्सचा उपद्रव कमी करून त्यांना वेसण लावण्यासाठी कायदा करण्यासंबंधीही सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे.

Advertisement
Tags :

.