शाळेचा दरवाजा तोडून शिवरायांच्या फोटोची मोडतोड
भुरूनक्की गावासह खानापूर तालुक्यात संतापाचे वातावरण
वार्ताहर/नंदगड
भुरूनक्की (ता. खानापूर) येथील प्राथमिक शाळेच्या खोलीचा दरवाजा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती भुरूनक्की गावासह खानापूर तालुक्यात पसरताच सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. भुरूनक्की येथील प्राथमिक शाळेला नेहमीप्रमाणे शनिवारी अर्धा दिवस व रविवारी पूर्ण दिवस सुटी होती. दरम्यानच्या काळात शाळा बंद होती. या काळात अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड केली आहे. याच शाळेच्या खोलीत अनेक महात्म्यांचे फोटो आहेत. परंतु छ. शिवाजी महाराजांच्या फोटोची जाणीवपूर्वक मोडतोड केली आहे.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुख्याध्यापकांसह अन्य शिक्षकांनी शाळेचा दरवाजा उघडला. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड केल्याने काचा सर्वत्र पसरल्याचे निदर्शनास आले. याची माहिती गावात पसरली. त्यामुळे ग्रामस्थांनी शाळेसमोर एकच गर्दी केली. शाळा मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी लागलीच नंदगड पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच नंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी यासंदर्भात पाहणी केली. लोकांचा वाढता संताप पाहता श्वानपथक बोलावून समाजकंठकाचा मागोवा घेतला. परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर बोटांचे ठसे घेण्यात आले. पोलीस अधिक तपास करत आहेत. शिवाजी महाराजांच्या फोटोची मोडतोड झाल्याची घटना समजतात भुरूनक्की येथील दत्ता पाटील, कल्लाप्पा पाटीलसह अनेक ग्रामस्थ व भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजप नेते पंडित ओगले सायंकाळी नंदगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्यांनी सदर कृती करणाऱ्याचा शोध घेऊन कारवाईची मागणी केली.