कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक ‘रूळा’वर नाहीच!
मंगला एक्सप्रेसला 14 तासांचा ‘लेटमार्क’; जबलपूर-कोईमतूरही 10 तास धावली विलंबाने; अन्य 20 रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम
खेड प्रतिनिधी
गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर सोडण्यात आलेल्या जादा गणपती स्पेशल गाड्यांमुळे नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. रविवारीही गणपती स्पेशलही अन्य 20 रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्क’ मिळाला. मंगला एक्सप्रेस तब्बल 14 तास तर जबलपूर-कोईमतूर 10 तास विलंबानेच मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. कोकण मार्गावरही विलंबाच्या प्रवासाचे ‘शुक्लकाष्ठ’ कायमच असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
गेल्या 5 दिवसांपासून गणपती स्पेशल गाड्यांसह नियमित गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. रविवारीही विस्कळीत वेळापत्रकाचा चाकरमान्यांना फटका बसला. सीएसएमटी-सावंतवाडी, रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-कुडाळ, कुडाळ- सीएसएमटी, पनवेल-रत्नागिरी, मंगळूर-अहमदाबाद आदी गणपती स्पेशल गाड्या दीड तासांच्या फरकाने मार्गस्थ झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. एलटीटी-एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस 4 तास 20 मिनिटे तर मंगळूर- सीएसएमटी एक्सप्रेस 4 तास 30 मिनिटे विलंबाने धावली.
एलटीटी-कोच्युवेली साप्ताहिक एक्सप्रेस 6 तास 20 मिनिटे, निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्सप्रेस 3 तास 25 मिनिटे, सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेससह ओखा एक्सप्रेस 3 तास 25 मिनिटे विलंबानेच रवाना झाल्या. मत्स्यगंधा एक्सप्रेस 2 तास 25 मिनिटे, एलटीटी-मडगावसह कोईमतूर-हिसार वातानुकूलित स्पेशल 2 तास विलंबाने धावली. दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस 2 तास 30 मिनिटे तर नागपूर-मडगाव स्पेशल दीड तास उशिराने रवाना झाल्या. अन्य रेल्वेगाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचाही प्रवाशांना फटका बसला.
दोन गणपती स्पेशलना डबा वाढवला
गणेशोत्सवामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. रेल्वेगाड्यांतील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 2 गणपती स्पेशल गाड्यांना स्लीपर श्रेणीचा 1 अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे. त्यानुसार 09150/09149 क्रमांकाची विश्वामित्री-कुडाळ स्पेशल 9 सप्टेंबर रोजी तर परतीच्या प्रवासात 10 सप्टेंबर रोजी एक स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्याची धावणार आहे. 09412/09411 क्र.ची अहमदाबाद-कुडाळ गणपती स्पेशल 10 सप्टेंबर रोजी तर परतीच्या प्रवासात 11 सप्टेंबर रोजी एक स्लीपर श्रेणीच्या डब्याची धावणार आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.