विरोधकांची पांगापांग
जेव्हा घराचे वासे फिरतात तेव्हा अचानक होत्याचे नव्हते होऊन जाते. हे प्रत्यक्षात घडले आहे की एक दु:स्वप्न आहे असा विचार करायला लागल्यास क्षणभरात वास्तव समोर येते. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे असेच झालेले आहे. पाच राज्यांच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी आणि एम के स्टालिन यांच्यासह तीन प्रस्थापित प्रादेशिक नेत्यांचे झालेले पानिपत आघाडीचे खाडकन डोळे उघडणारे ठरले आहे. या एव्हढ्या मोठ्या राजकीय पतनाने विरोधी पक्षांची दिवाळखोरी दिसत आहे हे दावे फारसे गैरलागू नाहीत.
ज्याममतादीदींना विरोधी पक्षांचे केवळ नेतृत्वच नको होते तर पुढील पंतप्रधान बनावयाचे होते त्या आता साध्या आमदारदेखील राहिलेल्या नाहीत इतके दिवस अचानक फिरले आहेत, राष्ट्रीय स्तरावर म्हणूनच दीदींनी राहुल गांधींना नेहमी पाण्यात पाहिले. या निकालांमुळे म्हटली तर गंभीर म्हटले तर गमतीशीर स्थिती निर्माण झाली आहे कारण ज्याला इंडिया आघाडी म्हणतात त्या विरोधी पक्षांच्या समूहालाच गळती सुरु झालेली आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री असताना राज्यातील इंडिया आघाडीच्या इतर पक्षांना दिवसरात्र नावे ठेवणाऱ्या ममतादीदींना आता अचानक आघाडीचा इतका पुळका आलेला आहे की यापुढील प्रवास सर्वांना साथ घेऊन करायचा त्या जणू प्रणच घेत आहेत. सत्ता गेल्यावर नेते मंडळी आपण मऊ झालो आहोत असे दाखवतात. अशावेळी दीदींचे काही पूर्वीचे सहकारी आता बोलते झाले आहेत आणि त्यांचे आरोप फार गंभीर आहेत. ‘राज्यात भाजप वाढायचे एकमेव कारण दीदी आहेत कारण त्यांनी जाणूनबुजून मित्रपक्षांना वाढूच दिले नाही, अशा वेळी अशा नेत्यांना तृणमूल अथवा भाजपचाच सहारा घ्यावा लागला आणि काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे दिवाळे निघाले.’, असा त्यांचा आरोप आहे. राहुल गांधी यांनी सर्व पक्षांना घेऊन चला असे आवाहन ममतादीदींना केले होते. त्याला त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्याचेच परिणाम त्या आज भोगत आहेत अशी त्यांची कानउघाडणी इंडिया आघाडीतील काही नेते करत आहेत.
तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या दैदिप्यमान विजयाने इंडिया आघाडीला तडा गेलेला दिसत आहे. काँग्रेसने विजयला सत्वर पाठिंबा देऊन द्रमुकला ठोकलेला राम राम त्या पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्याने काँग्रेसवर न भूतो, न भविष्यती अशा प्रकारचा केलेला हल्ला म्हणजे अचानक सत्ता गेल्याने स्टालिन किती बैचैन झालेले आहेत हे दाखवते, स्टालिन यांना आपला मुलगा आणि उपमुख्यमंत्री उदयनीधीला ठिकपणे मार्गदर्शन करता आले नाही आणि त्याने तसेच स्टालिन यांच्या जावयाने सारा राज्यकारभाराचा चुथडा केला असे आरोप आता होत आहेत. खरे तर या पराभवाने सर्वात जास्त हिरमोड हा उदयनीधी यांचा झालेला आहे. ते आपणच पुढील मुख्यमंत्री होणार या तोऱ्यात होते.
देशाचे राजकीय चित्र आणि चारित्र्य बदलू लागले आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक निकालांनी याची दिशा स्पष्ट झाली आहे. भाजपला कॉंग्रेस जिवंत ठेवायची आहे पण वाढू द्यायची नाही तर प्रादेशिक पक्ष हळू हळू कमजोर पडत चालले आहेत आणि याला तेच सर्वस्वी जबाबदार आहेत. प्रादेशिक अस्मिता, सामाजिक न्याय या मुद्यांमुळे राजकीय ताकत मिळालेले प्रादेशिक पक्ष आता नेत्याच्या कौटुंबिक मालकीचे झाल्याने जनतेपासून दुरावत जात आहेत. याचा फटका त्यांना महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, कर्नाटक या राज्यात बसला आणि तामिळनाडू त्याचे ताजे उदाहरण आहे. चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार, चिराग पासवान आणि बाकीचे फुटकळ प्रादेशिक पक्ष जे भाजपप्रणीत एन. डी. ए. चे घटक आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेहेरबानीने सत्तेत आहेत. बराच काळ आजारी असलेल्या नितीशना बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडायला भाजपने एकप्रकारे भाग पाडले आहे.
प्रादेशिक पक्ष संपल्याचा कोणताही फायदा काँग्रेसला होताना दिसत नाही याचे एकमेव कारण भाजपशी दोन हात करायचे कसे हेच या पक्षाला 2014 पासून समजले नाही. आणि ते समजण्यासाठी जी मेहनत नेत्याने करावी लागते, जनाधार वाढवावा लागतो, आपली टीम उभी करावी लागते तिथे कॉंग्रेस कमी पडली आहे. राहुल यांच्याकडे राजकारणातील समज नाही असे नाही पण मोदी-शहा यांचे डाव ते अगोदरच ओळखू शकत नाहीत. ममता बॅनर्जी यांचे बारा वाजले म्हणून कोणीही फारसे अश्रू ढाळायचे कारण नाही कारण राज्यकर्त्या म्हणून त्या अतिसुमार होत्या, अशी स्पष्टोक्ती त्यांचे एकेकाळचे सहकारी करायला लागले आहेत.
पश्चिम बंगाल लालचा भगवा झाला. 49 वर्षानंतर या राज्यात ज्या राष्ट्रीय पक्षाला बहुमत मिळाले त्याचे नाव भाजप होय. कोणत्याही आंदोलनाची राम मंदिर पार्श्वभूमी नसताना, पक्षातून नेतृत्व निर्माण होत नसताना तृणमूल कॉंग्रेसमधील फुटीर हाताशी घेऊन भाजप वाढला, तृणमूल कॉंग्रेस विरुद्धचा लोकातील असंतोष पकडला, निवडणुकीचे नियोजन केले आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष ढासळला. अशी तयारी ना काँग्रेसला करता आली ना डाव्यांना. या निवडणुकीत निवडणूक आयोग वादग्रस्त ठरला तर न्यायपालिका संदिग्ध राहिली, त्यामुळे 90 लाखाहून अधिक लोकांना मतदान करता आले
नाही.
तामिळनाडूत सिनेस्टार विजय यांच्या टीव्हीके या नवशिक्या पक्षाने द्रमुक, अण्णा द्रमुक या पक्षांना धूळ चारली. सरकार बनविण्यासाठी लागणारे बहुमत थोडक्यात चुकले असले तरी मोदी सरकार त्याला हळू हळू खेळवेल, नाचवेल आणि नंतर वाचवेल. त्यामार्फत तामिळनाडूत राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. 1966 पासून तामिळनाडू प्रादेशिक पक्षांच्या हाती राहिला आहे. तामिळनाडूतील मतदारांनी ‘टीव्हीके’ला का पाठिंबा दिला? या पक्षाचे नेते विजय यांचे नेतृत्व करिश्माई असले तरी ते अल्पमतातील सरकार कसे चालवतील? त्यांना केंद्राशी संघर्ष करणे परवडणारे नाही.
इंडिया आघाडीची नैय्या वास्तवतेच्या खडकावर आपटून ठिकऱ्या ठिकऱ्या होण्याची भीती असताना खरी कसोटी काँग्रेस नेतृत्वाची आहे. भाजपशिवाय एकमेव राष्ट्रीय पक्ष असलेला काँग्रेस गेल्या 11 वर्षात पाप्याचे पित्तर झालेला आहे. कावेबाज सत्ताधारी सगळ्या संविधानिक संस्थांचा गैरवापर करून काँग्रेसला पदोपदी अडचणीत आणत आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि मुख्य विरोधी पक्ष यांच्यामध्ये साधा संवाददेखील नाही. भाजपला देशात एकपक्षीय अंमल आणावयाचा आहे आणि त्यामुळे त्याला अशा कोणत्याही संवादात काडीचाही रस नाही असे जाणकार मानतात.
‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ या उक्तीप्रमाणे दुबळ्या झालेल्या विरोधकांना कोण साथ देणार? घटक पक्षांनी आपणहून कंबर कसली तरच हे शक्य आहे. भोजनभाऊ म्हणून प्रसिद्ध असलेले हे गैरकाँग्रेसी पक्ष आता खरे कामाला लागणार काय? जो कोणी सत्तेत असेल त्याचे लांगूलचालन आता होऊ शकत नाही. भाजप त्यांच्या जीवावरच उठलेला आहे. ज्या प्रकारे अरविंद केजरीवाल यांच्या राज्यसभेतील सात खासदारांना भाजपने आपल्यात सामील करून घेऊन आम आदमी पक्षाला दणका दिला तसे धक्के येत्या काळात बसणारच नाहीत असे नाही.
सुनील गाताडे