For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँक कर्मचाऱ्यांचा पगार 17 टक्क्यांनी वाढणार

06:27 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
बँक कर्मचाऱ्यांचा पगार 17 टक्क्यांनी वाढणार
Advertisement

राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांना लाभ : वाढीव सुट्ट्याही मिळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे आठ लाख कर्मचाऱ्यांना निवडणुकीपूर्वी मोठी खूषखबर मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक 17 टक्के वाढ होणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या या निर्णयाचा फायदा सुमारे आठ लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात शुक्रवारी 17 टक्के वार्षिक पगारवाढीवर सहमती झाल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर वार्षिक 8,284 कोटी ऊपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

Advertisement

इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन यांनी शुक्रवारी प्रलंबित असलेल्या या करारावर स्वाक्षरी केली. आठवड्यातील पाच दिवस बँकिंग देखील ‘आयबीए’ने स्वीकारले आहे. सदर प्रस्तावर सरकारकडे पाठवला गेल्यानंतर सहा महिन्यांत निर्णय घेतला जाईल. पगारवाढ व इतर सुविधा तत्काळ लागू करण्यात आल्या आहेत. त्यांचे लाभ 1 नोव्हेंबर 2022 पासून उपलब्ध होतील. रजा, पगारवाढ यासह अनेक मागण्यांबाबत बँकिंग संघटनेची आयबीएशी दीर्घकाळ चर्चा सुरू होती, मात्र अंतिम करार होऊ शकला नाही. महाशिवरात्रीला आयबीएने बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून सामंजस्य करार केला.

आयबीए, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी सल्लामसलत करून वार्षिक वेतनात सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित वेतनश्रेणीमुळे लिपिक कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 ते 30 हजार ऊपयांनी तर अधिकाऱ्यांच्या पगारात 13 ते 50 हजार ऊपयांची वाढ होणार आहे. वेतनासोबतच दर शनिवारी सुटी म्हणून मंजूर करण्याचेही मान्य करण्यात आले आहे. मात्र कामकाजाच्या वेळेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या अधिसूचनेनंतर अंमलात येईल, असे ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने सांगितले.

महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा

नवीन वेतन करारानुसार सर्व महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र न देताही एक दिवसाची आजारी रजा दिली जाईल. त्यानुसार दरमहा वाढीव वेतन दिले जाईल. तसेच संचित विशेषाधिकार रजा (पीएल) सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेदरम्यान कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या वेळी 255 दिवसांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असे बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने सांगितले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे भरलेल्या पेन्शन/कौटुंबिक निवृत्ती वेतनाव्यतिरिक्त मासिक अनुग्रह रक्कम देण्यावर सहमती झाली आहे. ही रक्कम 31 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पेन्शन मिळण्यास पात्र ठरलेल्या पेन्शनधारकांना आणि कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना दिली जाईल. त्या तारखेला निवृत्त होणारे लोकही याच्या कक्षेत येतील.

Advertisement
Tags :

.