For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिष्याच्या प्रगतीने सद्गुरु नेहमीच संतुष्ट होतात`

06:21 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिष्याच्या प्रगतीने सद्गुरु नेहमीच संतुष्ट होतात
Advertisement

मी कर्ता आहे हा जीवाचा अहंकार गेला तर त्याचे ब्रह्माशी असलेले ऐक्य त्याच्या लक्षात येते. अधियज्ञ मीच असून अहंकार घालवण्याचे काम करतो असं भगवंतांनी चौथ्या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितलं. तो श्लोक ह्याप्रमाणे

Advertisement

अधि-यज्ञ असे मी चि ह्या देही यज्ञ-पूत जो ।। 4 ।। अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा असून नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. कायम आपल्या मनासारखं घडावं असं माणसाला वाटत असतं पण असं घडतंच असं नाही मग त्याच्या लक्षात येतं की, आपण कर्ते नसून ईश्वर कर्ता आहे. हा विचार पक्का झाला की, त्याच्या मनात अशी भावना दृढ होते की, समोर दिसणाऱ्या दुनियेतील सर्व घटना ईश्वरी इच्छेनुसार घडतात आणि माणसाच्या इच्छेला त्यात काहीही स्थान नाही. तेव्हापासून त्याच्या मनात अमुक एक घडावं किंवा अमुक एक घडू नये असे विचार येत नाहीत. माणसाचे मन ह्या भूमिकेवर स्थिर झाले की, त्याला वैराग्य आले असे म्हणतात.

श्लोकाच्या विवरणात माउली भगवंतांनी केलेले अधियज्ञाचे रूपक समजावून सांगताना म्हणतात, यज्ञामध्ये आहुती देऊन यज्ञ पूर्ण करतात त्याप्रमाणे जीवनाच्या यज्ञामध्ये मनाला भुरळ पडून निरनिराळ्या विषयांचा उपभोग घ्यायला भाग पाडणाऱ्या ज्ञानेंद्रियांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचा अग्नी म्हणून उपयोग करणे. इंद्रियांचा अग्नी पेटला की, त्यात मनात येणाऱ्या विचारांची आहुती द्यावी. विचारांची आहुती दिली की, इच्छा, अपेक्षा आपोआपच नष्ट होतात. असा यज्ञ करण्याचे धैर्य येण्यासाठी स्वधर्माचे पालन निरपेक्षतेने करावे. इंद्रियांच्या अग्नीने वैराग्यरूपी लाकडे धडधडून पेटतात. नंतर वज्रासनात बसून धारणा ध्यान आणि समाधी ह्या अष्टांग योगातील शेवटच्या तीन टप्प्यांची साधना करावी. मग मन, प्राण, इंद्रिये आणि संयम अशा यज्ञसंपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नी संतुष्ट होतो. अशा रीतीने ह्यातलं माझं काहीही नाही ह्या भावनेने वर सांगितलेले साहित्य, ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही ज्ञेयामध्ये लय होतो. ज्ञात, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी आहे. त्यातील मी कर्ता आहे ही भावना आधीच लयाला गेलेली असते. नंतर मला आत्मज्ञान झालंय हा विचारही येथे संपुष्टात येतो. ज्ञाता आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी संपल्याने फक्त ज्ञेयच उरते. ह्या यज्ञाला अधियज्ञ असे म्हणतात. भगवंतांनी सांगितलेली अधियज्ञाची माहिती अतिशय बुद्धिमान असलेल्या अर्जुनाच्या लगेच लक्षात आली. भगवंतांनी हे जाणले.

Advertisement

शिष्याच्या लक्ष देऊन ऐकण्याच्या वृत्तीने आणि त्याच्या होत असलेल्या प्रगतीने सद्गुरू नेहमीच संतुष्ट होतात कारण त्यांचे त्यांच्या शिष्यावर आईप्रमाणेच प्रेम असते. लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. अर्जुनाची प्रगती पाहून अष्टसात्विकभावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णांच्या अंगी मावेनासा झाला.

क्रमश:

Advertisement
Tags :

.